वाशिम - जिल्हा नुकताच कोरोनामुक्त झाला आहे. मात्र, लॉकडाऊनचा नियम मोडून खचाखच मजुरांनी भरलेला एक कंटेनर आज(रविवारी) कुकसा चेक पोस्टवरून जिल्ह्यात दाखल झाला. मालेगावमध्ये डिझेल भरण्यासाठी तो कंटनेर थांबला असता, पोलिसांनी सर्व मजुरांना ताब्यात घेऊन पुन्हा माघारी पाठवले आहे. हे सर्व मजूर बिहारला आपल्या गावी जात होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
मालेगाव शहरातील श्याम पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी एक कंटेनर थांबला होता. त्यावेळी शहरात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कंटनेरची तपासणी केली. त्यावेळी कंटेनरमध्ये शंभरहून अधिक मजूर कंटेनरमध्ये आढळून आले.
पोलिसांनी या सर्व मंजुरांची विचारपूस केली असता, ते सर्व बिहार येथील असल्याची माहिती मिळाली. हे सर्वजन कंटेनरमधून बिहारमध्ये आप-आपल्या गावी जात होते. मात्र पोलिसांनी तत्काळ कंटनेरला ताब्यात घेत या घटनेची माहिती जिल्हाधिकारी व मालेगावच्या तहसीलदार यांना दिली. त्यानंतर या सर्व मजुरांना पुन्हा ज्या ठिकाणाहून आणले आहे. त्या ठिकाणी सोडण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.
वाशिम जिल्हा कोरोनामुक्त असला तरी सीमेवरील चेकपोस्टवरून हा ट्रक जिल्ह्यात कसा काय दाखल झाला. हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. परिणामी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.