वाशिम - जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वाशिमसह रिसोड, मंगरुळपीर आणि कारंजा इथे डिसीएच, डिसीएचसी आणि सीसीसी सुरू करण्यात आली होती. या सर्व केंद्रात एकूण 1255 रुग्णांच्या उपचाराची सुविधा होती. त्यामध्ये 27 व्हेंटिलेटर आणि 870 ऑक्सिजन बेड होते. मात्र, डिसेंबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने सर्व कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले होते. परंतु कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने ही कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई -
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. तसेच सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमासाठी केवळ 50 व्यक्तींना परवानगी असून जे नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. आज वाशिम जिल्ह्यात विनाकारण फिरणे व मास्क न वापरण्याऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - विठ्ठल भक्तांच्या सेवेत दोन ई-रिक्षा दाखल; दिव्यांगांना होणार लाभ