वाशिम - कोरोनाविरोधातील लढाईत डॉक्टरांप्रमाणेच पोलिसही आपल्या कुटुंबाचा विचार न करता जीव धोक्यात टाकून आपले कर्तव्य बजावत आहेत. या सगळ्यात वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार योगिता भरद्वाज या देखील आहेत. आपल्या पाच वर्षांच्या लहान मुलाला घरी ठेवून त्या लॉकडाऊनचा बंदोबस्त करत आहेत. त्यांनी आपल्या मुलाचा संभाळ करण्यासाठी एका दुसऱ्या महिलेची मदत घेतली आहे. त्यामुळे कर्तव्यावर असताना पाच वर्षांचा मल्हार आपली आई घरी कधी येणार, याची वाट पाहत असतो.
देशात कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडून विविध योजना करण्यात येत आहेत. त्याच बरोबर या कोरोनाच्या लढ्यात अनेक डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत पोलीस देखील आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत.
हेही वाचा... Mother's Day : मम्मा लवकर ये.. मला आठवण येतेय! 52 दिवसांपासून मायलेकांची ताटातूट
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात आणि राज्यात २२ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठा बंद आहेत. तरी देखील नागरिकांची रस्त्यावर सतत गर्दी होत असते. त्यामुळे पोलिसांना नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात टाकून रस्त्यावर उभे रहावे लागत आहेत. या सर्व धावपळीमुळे वाशिममध्ये एका आई आणि मुलाच्या नात्याची ओढाताण होत आहे. मात्र, कोरोनाच्या लढ्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता भरद्वाज या मात्र आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत.
योगिता या आपले कर्तव्य बजावून घरी गेल्यानंतर, त्यांचा मुलगा मल्हार त्यांच्याकडे झेपावतो. मात्र, योगिता या स्वतःला पूर्णपणे सॅनिटायझ करण्यासाठी एक तासाचा अवधी देतात. त्यानंतर त्या आपल्या चिमुकल्याला जवळ घेतात. पोलिसांवरील तान कमी करण्यासाठी निदान आता तरी नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये, हीच अपेक्षा.