वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असताना रस्त्यावर शेकडो मजूर गावाकडे पायी चालत जात असल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनदरम्यान हाताला काम नसल्यामुळे अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या मुळगावाकडे निघाले आहेत. मुंबई, पुणे यांसारख्या शहरातून आपल्या गावाकडे जात असलेल्या काही लोकांचे लोंढे आता वाशिम जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या लोकांशी त्यांच्यासोबत पायी चालत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने बातचीत केली असून त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
हेही वाचा... वाशिममध्ये नागरिकांची रस्त्यांवर गर्दी, 'फिजिकल डिस्टन्सिंग'चा फज्जा
चार सौ किलोमीटर चले हैं, अभी और बाकी है...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु झाल्याने दररोज होणाऱ्या उपासमारीला कंटाळून मुंबई, पुणे आणि औरंगाबाद यांसारख्या शहरातून अनेक मजूर आपापल्या कुटुंबासह छत्तीसगड, उत्तर प्रदेश या आपल्या गृहराज्याकडे पायी निघाले आहेत. त्यांनी प्रवासादरम्यान निवासासाठी, भोजनासाठी आवश्यक त्या वस्तुंना सोबतच घेतले आहे. दिवसा पायपीट करणे आणि रात्री आराम, असा या मजूरांचा प्रवास सुरु आहे. ईटीव्ही भारतने बातचीत केलेल्या काही मजूरांनी आपण छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार येथे जाणार असल्याचे सांगितले.
वाशिम जिल्ह्यात सध्या 42 डिग्री इतके तापमान आहे. या रखरखत्या उन्हातही मुंबई-नागपुर आणि दिल्ली-हैदराबाद महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून हे मजूर पायपीट करत आहेत. मे महिन्यातील कडक उन्हाळा आणि महामार्गावर दररोजचे चालणे, असा या मजुरांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे.