वाशिम - जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचं अतोनात नुकसान झाले या नुकसानीची पाहणी केंद्राच्या 1 सदस्यीय पथकाकडून आज करण्यात आली. यावेळी काही मिनिटातच नुकसानीची पाहणी करण्यात आल्याने शेतकरी वर्ग नाराज झाला आहे.
तब्बल 3 आठवड्यांच्या उशिराने हे पाहणी पथक आल्याने यांनी नेमके काय पाहायला हे पथक आले होते, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग यांनी जिल्ह्यातील महागांव, बाळखेड, नागठाणा व वांगी या परिसरातील नुकसानीची पाहणी केली. त्यांनी केवळ काही मिनिटेच पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.
या पीक नुकसानीला जवळपास 3 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पीक पेरणीसाठी शेती तयार केली आहे. त्यामुळे आज खरीप पीक नुकसानीचे काय दिसणार, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला असून भरीव नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.
हेही वाचा - प्रगतशील शेतकऱ्यावर डाळिंब बाग नष्ट करण्याची वेळ