वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन अहोरात्र झटत आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत लोक बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात अशा लोकांना चाप बसावा यासाठी वाशिम शहरातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत पुढाकार घेतला. लोकसहभागातून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे या कॅमेऱ्याचे कंट्रोल वाशिम शहर पोलीस ठाण्यात असणार आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे सोपे होणार असल्याचे मत सहायक पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी व्यक्त केले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरातील नागरिक कोरोना विरुद्धच्या लढाईत आरोग्य विभाग व पोलिसांना साथ देत आहेत.