बुलडाणा - वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी वंचितकडून उमेदवारी स्वीकारलेल्या शिंदेंनी अर्ज भरताना मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. यामुळे शिंदेंच्या बाबतीत 'एका बाळासाहेबांच्या पक्षाने दूर लोटले, तर दुसऱ्या बाळासाहेबांच्या पक्षाने तारले', अशी चर्चा सध्या मतदारसंघात पहायला मिळत आहे.
हेही वाचा... महाआघाडीच्या 'शपथनाम्या'त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी; केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन शिवसेना पक्षात मागील 35 वर्षे कार्यरत असलेल्या माजी आमदार विजयराज शिंदे यांना यावर्षी पक्षाने तिकीट नाकारले. यामुळे नाराज झालेल्या शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेच्या तिकीटावर संजय गायकवाड यांना उभे केल्याने शिंदेच्या रूपाने शिवसेनेत बंडाळी पहायला मिळत आहे. मागील 35 वर्षांपासून एक नेता, एक झेंडा, एक पक्ष अन् एकच चिन्ह असा प्रवास करत आलेले विजयराज शिंदे यांनी पक्षातून तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन वंचितमध्ये प्रवेश केला. या अगोदर शिंदे हे 3 वेळा आमदार राहीलेले आहे. मात्र यावेळी तिकीट न मिळाल्याने त्यांनी पक्षाला राम राम ठोकलाय.
हेही वाचा... 'मॉब लिंचींग' आपली संस्कृती नाही; हा शब्द पाश्चिमात्यांच्या धर्मग्रंथात - मोहन भागवत
माजी आमदार विजयराज शिंदे हे शिवसेनेच्या उमेदवारीसाठी मुंबईत ‘मातोश्री’ वर पक्षप्रमुखांकडे तळ ठोकून असतांना, इकडे मेहकरात संपर्कप्रमुखांच्या निवास स्थानावरुन संजय गायकवाड यांना प्रतापराव जाधवांनी एबी फॉर्म देऊन टाकला. त्यामुळे मुंबईहून बुलडाण्याला परतलेल्या विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी झालेल्या अन्यायाप्रती संतप्त भावना व्यक्त करत, आता माघार न घेता मैदानात उतरुन लढा, असे आवाहन शिंदें यांना केले होते.
यानंतर शिंदे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत संपर्क करून प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांची भेट घेत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आणि मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्जही दाखल केला. यावेळी त्यांनी मागील ५ वर्षात सातत्याने आपल्याला डावलून अपमानजनक वागणूक दिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच पक्षाकडून कधीतरी न्याय मिळेल, या आशेवर आपण होतो मात्र अन्य उमेदवारांना एबी फॉर्म ‘मातोश्री’ वर पक्षप्रमुखांनी वाटले, फक्त बुलडाण्याचा एकमेव एबी फॉर्म संपर्कप्रमुखांनी दिल्याचा हल्लाही त्यांनी यावेळी चढविला. यामुळे आता कार्यकर्त्यांच्या भरवशावरच आपण 'वंचीत’कडून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची भावना शिंदेंनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा... मराठा क्रांती मोर्चा आणि शिव प्रहारच्या प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अनेक वेळा पक्ष बदलूनही पक्षात आलेल्या दलबदलूंना संपर्कप्रमुखाने वरिष्ठ पातळीवर खासदारकीचा राजीनामा देण्याची धमकी देत उमेदवारी मिळवून दिली आणि पक्षातील निष्ठावंतावर अन्याय केल्याचा आरोप शिंदेंनी यावेळी केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच अन्याय सहन न करण्याची शिकवण दिली आहे, त्या प्रमाणेच आपण वागलो असेही शिंदे यावेळी म्हणाले आहे. यामुळे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात विजयराज शिंदे यांनी वंचितकडून निवडणूकीत उतरत शिवसेना उमेदवाराला कडवे आव्हान उभे केल्याचे दिसत आहे. तसेच बुलडाण्यात युती असूनही भाजपच्या योगेंद्र गोडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.