वाशिम - महाराष्ट्रातील प्रमुख मसाले पीक व आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड करतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटाने हळदीला चार ते पाच हजार इतका अत्यल्प भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. हळद हे वर्षभराचे पीक असून उत्पादन खर्च मोठा आहे.
सध्याचे भाव पाहता उत्पादन खर्चही निघणे शक्य नाही. त्यामुळे हळदीला किमान दहा हजार रुपये हमीभाव शासनाने द्यावा, या प्रमुख मागणीसह हळदीला पीक विमा संरक्षण देण्यात यावे. शासनाने हळदीची खरेदी करावी. नैसर्गिक आपत्तीत हळद पिकाला मदत देण्यात यावी. शासनाच्या विविध योजने अंतर्गत यांत्रिकीकरण व सिंचनासाठी लागणारे साहित्य हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्यात यावे. पीक कर्ज वाटपात एकरी पन्नास हजार रुपये हळद उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावे आदी मागण्यांसाठी अंगाला हळद लावून भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने वाशिम येथे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत यावेळी सरकारचा निषेध करण्यात आला.