वाशिम - शासनाकडून मंजूर झालेली घरकुलाची रक्कम अचानक दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर वळती केल्याचा आरोप वाशिममधील एका व्यक्तिने केला आहे. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे तक्रारदार व्यक्तीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे.
गजानन खिल्लारे असे आंदोलन करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मुठ्ठा येथील रहिवासी असलेले गजानन खिल्लारे यांना घरकुल मंजूर झाले होते. त्यासाठीची 1 लाख 72 हजार 860 रुपयांची रक्कम मात्र दुसऱ्याच्या खात्यात वळवण्यात आली. याची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. एकदा उपोषणही केले. मात्र संबंधितावर कारवाई झाली नाही.
हेही वाचा - आता धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे मिळणार ५०० रुपये
खिल्लारे यांनी 5 डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे आत्मदहन करण्याची परवानगी मागितली. यानंतरही जिल्हा प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. या सर्व प्रकरणाला त्रस्त होऊन शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालया शेजारील टॉवरवर चढून खिल्लारे यांनी आंदोलन सुरू केले आहे.