वाशिम - कोरोना संसर्गाच्या दोन्ही लाटेत वयाची नव्वदी ओलांडलेल्या जिल्ह्यातील एकूण ३५४ वृद्धांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, त्यातील केवळ एकाचाच मृत्यू झाला असून, ३५३ वृद्धांनी कोरोनावर मात केली. दमदार रोगप्रतिकारशक्ती आणि दांडगा आत्मविश्वास हेच त्यामागील खरे रहस्य असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा - मराठी ओटीटीची येत्या ५ वर्षांत असेल ५०० कोटी रुपयांची उलाढाल - अक्षय बर्दापूरकर
दरम्यान, कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये ६१ ते ७५ वर्षे वयोगटातील ४००६ वृद्ध कोरोनाने बाधित झाले होते. त्यापैकी २२५ जणांचा मृत्यू झाला. ७६ ते ९० वर्षे वयोगटातील ५५७ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी ४९ जणांना प्राण गमवावे लागले. त्या तुलनेत ९१ पेक्षा अधिक वय असलेल्या ३५४ वृद्धांपैकी तब्बल ३५३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यातील केवळ एका वृद्धाचा संसर्गाने मृत्यू झाला आहे. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, दमदार रोगप्रतिकारशक्ती आणि सकस आहारामुळेच हे शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे.
- ७६ - ९० चा वयोगटही ठरला दमदार
७६ ते ९० वर्षे वयोगटातील वृद्धांनीही कोरोनाच्या संसर्गावर मात केली आहे. या वयोगटातील एकूण ५५७ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील ४९ जणांचा मृत्यू झाला, तर उर्वरित ५०८ जण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
- ३१-४५ चा वयोगट सर्वाधिक बाधित
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ३१ ते ४५ वर्षे वयोगटातील २ हजार १८० तर दुसऱ्या लाटेत १० हजार ६८६ असे एकूण १२ हजार ८६६ जण बाधित झाले. अन्य सर्व वयोगटातील बाधितांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे, तर सर्वाधिक २२५ मृत्यू ६१ ते ७५ वर्षे वयोगटातील बाधितांचे झाले आहेत.
हेही वाचा - स्पुटनिक लसीसाठी पालिका वेगळे कोल्ड स्टोरेज उभारणार; मुंबई महापौरांची माहिती