वाशिम - जिल्ह्यातील रिसोड येथील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या एका शंभर वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत रिसोड तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. शासन प्रशासन या विरोधात लढा देत आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तर कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा आलेख चांगला चढत आहे. मात्र, रिसोड तालुक्यातील घोटा येथील शंभर वर्षीय आजोबांनी कोणत्याही रोगाशी लढा दिला जाऊ शकतो व ती जिंकता येते, हे सिद्ध करून दाखवले.
रोगप्रतिकार शक्तीमुळे फायदा -
रिसोड येथील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये एक मार्च रोजी भिकाजी आयाजी मोरे यांना कोरोना संक्रमण झाल्याने दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांनी कसोशीने प्रयत्न करीत मोरे यांचा उपचार केला. यानंतर आज 12 मार्चला त्यांना सुटी देण्यात आली. ते पूर्णपणे तंदुरुस्त बरे झाले आहेत. संक्रमणाचा उपचार करतांना भिकाजी मोरे यांची रोगप्रतिकार शक्ती ही बलाढ्य असल्याने डॉक्टरांना उपचार करताना फायदा झाला. रुग्णालयातील डॉक्टर महेंद्र बबेरवाल, जितेंद्र शिंदे, अनिल तापडिया, रवी बोरा, संजय खोडके या डॉक्टरांच्या निगराणीत उपचार करण्यात आले.
हेही वाचा - मास्क व्यवस्थित घातला नाही तर प्रवाशांना विमानातून उतरवावे-डीजीसीआयचे आदेश