वर्धा - पवनार येथील धाम नदी परिसरात फिरायला गेलेल्या युवकाचा पाय घसरून पडल्याने नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. राहुल खोडके (वय ३३ रा. बोरगाव (मेघे)) असे मृत युवकाचे नाव आहे.
राहुल हा शहरातील फुटवेअरच्या दुकानामध्ये काम करत होता. तो दुकानातील आशिष भाजीपाले आणि अन्य दोघांसोबत पवनार येथे फिरायला गेला होता. राहुल हा नदीपात्राच्या काठावर उभा होता तर अन्य मित्र त्याचे फोटो काढत होते. दरम्यान, राहुलचा पाय घसरला आणि तो गांधी-विनोबा यांच्यासमाधी स्थळाजवळ असलेल्या गायमुख डोहात पडला. त्या ठिकाणी धबधबा असून तो खड्ड्यात जाऊन अडकला.
त्याला वाचवायला आशिष भाजीपाले याने पाण्यात उडी घेतली. पण तोही बुडू लागला. यावेळी पवनार येथील भारत पटेल नामक युवकाने प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवाची परवा न करता आशिषला बाहेर काढले. मात्र, राहुलचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला.
याबाबत सेवाग्राम पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही युवकांच्या मदतीने खोल पाण्यात मृतदेहाचा शोध घेतला. तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर राहुचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती सेवाग्राम पोलीस निरीक्षक संजय बोठे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.