वर्धा - महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरु रजनीश कुमार शुक्ल यांनी योग हा आपल्या दिनचर्येचा भाग असला पाहिजे, असे मत व्यक्त केले. सर्वांनी योग करावा, स्वतःची ओळख आणि चेतना जागृती ही योग अभ्यासामुळे शक्य आहे, असेही ते म्हणाले.
कोरोना आपल्या श्वासाची गती आणि फुफ्फुसांना प्रभावित करतो. अशात योग हाच एकमेव उपाय आहे जो कोरोनाला दूर ठेवू शकतो. नियमित सकाळी योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव केल्यास कोरोना संकटात आपण आपले शरीर, मन, बुद्धी स्वस्थ ठेऊ शकतो. कोरोनाच्या काळात योग अभ्यासातून नकारात्मकता घालवता येऊ शकेल. तसेच शरीरासोबतच मन प्रसन्न आणि उर्जावान होण्यास मदत होईल, असे रजनीश कुमार पुढे म्हणाले.
भारताने जगाला योगाचा मार्ग दाखवलेला आहे. योग अनेक रोगांपासून दूर राहण्याचा मार्ग आहे. यासह दुर्धर आजारांतून मुक्त होण्यासाठी याचा फायदा होत आहे. आज निर्माण झालेल्या परिस्थितीत योगाशिवाय दुसरा चांगला मार्ग नाही, असेही ते म्हणाले. योग दिवस कार्यक्रम गुगल मीट व यूट्यूब चॅनल (vcomgahv) वर प्रसारित करण्यात आला. कार्यक्रमात शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता.