वर्धा - वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील केळझर येथे धाब्यावर काम करत असलेल्या महिला ग्रामपंचायत सदस्याच्या पतीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रात्रीच्या अंधारात दगडाने ठेचून गंभीर निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली. जगदीश अंबागडे असे मृताचे नाव आहे. नागपूर मार्गावरील नर्सिंग कॉलेजसमोर झुडपात बुधवारी सकाळी मृतदेह आढळून आला. हत्येचे करण अद्याप कळू शकले नाही.
सेलू तालुक्यातील केळझर ग्रामपंचायत सदस्या शालिनी अंबागडे या आहेत. शालिनी यांचा भाऊ नंदकिशोर थुल आणि पती जगदीश हे दोघे धाबा सांभाळत होते. राज्य मार्गावर वर्धा-नागपूर दरम्यान न्यू जलसा म्हणून हा धाबा आहे. मंगळवारी सायंकाळी दुचाकी (क्र. एमएच 32 2603) धाब्यावर जाण्यासाठी निघाले. मात्र, बराच वेळ लोटूनही ते धाब्यावर पोहोचलाच नाही. त्याच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता रिंग जात होती. पण फोन उचलत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. रात्रीच्या अंधारात सर्वत्र शोधाशोध सुरू करण्यात आली. मात्र, कुठेही त्याचा थांगपत्ता लागला नाही.
बुधवारी महामार्गावरील सुनिता नर्सिंग स्कूलसमोर रस्त्याच्या कडेला त्याचा बरमूडा दिसून आला. काही अंतरावर जाऊन पाहिले असता कडुलिंबाच्या झाडाखाली त्याचा मृतदेह आढळून आला. पुढे जाऊन त्याचा मोबाईलसुद्धा आढळून आला. मात्र, चेहरा दगडाने ठेचला असल्यामुळे विद्रूप झाला होता. तर घटनास्थळी मिळालेल्या काही वस्तूंवरून त्याची ओळख पटली.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे, सेलूचे ठाणेदार सुनील गाढे, पोलीस उपनिरीक्षक सौरभ घरडे यांच्यासह पुंडलिक गावंडे, नितीन नलावडे यांनी पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला आहे.