वर्धा - सध्या कोरोना विषाणूमुळे भयग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या विषाणूला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरू आहेत. यामुळे खासदार रामदास तडस यांनी पंतप्रधान रिलीफ फंडाला स्वतःचे एका महिन्याचे वेतन देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच, कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी लोकसभा मतदार संघाला खासदार फंडातून 1 कोटींचा निधी देणार असल्याचीही घोषणा केली आहे.
जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. तरीही, पुढील काळ महत्त्वाचा असल्याने लॉकडाऊनला सहकार्य करत लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे. यावरील इतर प्रतिबंधात्मक उपाय, आरोग्य व्यवस्था आणि उपचारांसाठी आर्थिक तरतुदींची गरज आहे. यासाठी पंतप्रधान मदत निधीला तडस यांनी एका महिन्याचे वेतन देण्याचे ठरवले आहे. तसेच वर्धा आणि अमरावती लोकसभा मतदार संघातील उपाययोजनांसाठी खासदार फंडातून एक कोटी देणार असल्याचेही जाहीर केले आहे.
देशातील दानशूर आणि श्रीमंत व्यक्तींनी पुढाकार घेऊन पंतप्रधान मदत निधीला आर्थिक सहाय्य द्यावे, असे आवाहन तडस यांनी केले आहे. तसेच, नागरिकांनी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, शक्यतो घरातच राहावे, कोरोना विरुद्धच्या लढ्यात यशस्वी होण्यात देशाला मदत करावी, आवाहनही खासदार तडस यांनी केले आहे.