मुंबई : महायुतीत जागा वाटपात २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच सुरू होती. जास्तीत जास्त जागा स्वतःच्या पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात सर्वच राजकीय पक्ष होते. परंतु यामध्ये भाजपा राज्यात सर्वात जास्त जागा लढवण्यात यशस्वी झाला असून भाजपा कागदावर १४८ जागांवर निवडणूक लढवत असला तरी, प्रत्यक्षात मात्र भाजपानं १६० जागा आपल्याकडं ठेवल्या आहेत. याची गणितं काय आहेत, ते जाणून घेऊयात.
भाजपाच्या रणनीतीचा एक प्रकार : लोकसभा निवडणुकीत भाजपानं केलेल्या अंतर्गत सर्वेचा फटका जागावाटपा दरम्यान शिंदे शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला होता. जागा वाटपाच्या मुद्द्यावर शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटप जाहीर करण्यास उशीर झाल्यामुळं प्रचारात आघाडी घेता आली नाही आणि त्याचाही फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला. अशात विधानसभा निवडणुकीत भाजपा पेक्षा एक पाऊल पुढे राहण्याचा प्रयत्न शिंदे आणि अजित पवार पक्षाने केला असला तरी सुद्धा अपक्षेप्रमाणे भाजपा महायुतीतच नव्हे तर राज्यात १४८ जागांसह सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष ठरला आहे. इतकेच नाही तर भाजपानं चलाखीनं शिंदे आणि अजित पवार पक्षात स्वतःचे १२ उमेदवार पेरले असून हा सुद्धा भाजपाच्या रणनीतीचा एक भाग आहे. मागील लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव लक्षात घेता विधानसभा निवडणुकीत भाजपानं सावध पवित्रा घेतला. जागा वाटपावरून महायुतीत कुठलेही वाद होता कामा नयेत. यावर भाजपा नेत्यांनी बारकाईनं लक्ष दिलं. जागावाटपाच्या बैठका मुंबई ते दिल्लीपर्यंत चालल्या.
अप्रत्यक्ष भाजपाचे एकूण तब्बल १६० उमेदवार : मागील लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव लक्षात घेता विधानसभा निवडणुकीत भाजपानं सावध पवित्रा घेतला. टप्प्याटप्प्यानं उमेदवारांची यादी जाहीर केली गेली. भाजपानं ९९ उमेदवारांची पहिली यादी घोषित करत जागा वाटपात आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत भाजपानं राज्यात १४८ उमेदवार उतरवले आहेत. तर शिंदे आणि अजित पवार पक्ष हे या मित्र पक्षांच्या जागेवर सुद्धा त्यांच्या चिन्हावर भाजपानं आपले १२ उमेदवार दिले आहेत. अशाप्रकारे कागदावर १४८ जागांचा आकडा दाखवणारा भाजपा वास्तविक १६० जागांवर पोहोचला आहे, असं दिसतं.
देवेंद्र फडणवीस यांची चाणक्य बुद्धी : भाजपानं निवडणुकीसाठी राज्याची सूत्रं देवेंद्र फडणवीस यांच्या हाती दिली. तेव्हाच महायुतीत भाजपाला १५० ते १६० जागा मिळायला हव्यात अशी अटही घातली होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांची चाणक्य बुद्धी कामी आली आहे. आपल्या पक्षातील उमेदवारांची अजित पवार पक्षात पेरणी करण्यासाठी त्यांनी, तुमच्याकडं सक्षम उमेदवार नाही. जिल्ह्यात तुमची पक्ष संघटना मजबूत नाही. आमच्याकडं जास्त आमदार असतानाही आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्री पद दिलं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सुद्धा मित्र पक्षासाठी त्यातून उमेदवार निवडून आणण्यासाठी त्याग करायला हवा अशी कारणे पुढे करण्यात आली आहेत.
भाजपानं मित्रपक्ष शिंदे सेनेकडे दिलेले उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ
१) निलेश राणे (कुडाळ )
२) रंजना जाधव (कन्नड)
३) शायना एन सी (मुंबादेवी)
४) मुरजी पटेल (अंधेरी पूर्व)
५) राजेंद्र गावित (पालघर)
६) विलास तरे (बोईसर)
७) संतोष शेट्टी (भिवंडी पूर्व)
८) राजेंद्र राऊत (बार्शी)
भाजपानं अजित पवार पक्षाकडे दिलेले उमेदवार व त्यांचे मतदारसंघ
१) प्रतापराव चिखलीकर (लोहा)
२) निशिकांत पाटील (इस्लामपूर)
३) राजकुमार बडोले (अर्जुनी - मोरगाव)
४) संजय काका पाटील (तासगाव कवठेमहांकाळ)
हेही वाचा -