मुंबई : मालाड पश्चिम मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रतेबाबत दिशाभूल करणारी माहिती दिली असल्याचा आरोप करत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती देताना हेराफेरी केल्याचा आरोप सोमैया यांनी केला आहे. अस्लम शेख जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा २००९ च्या निवडणुकीत शेख यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संदेश विद्यालय ज्युनियर कॉलेज मधून 12 वी वाणिज्य शाखेतून मार्च 1991 मध्ये उत्तीर्ण झाल्याची माहिती दिली होती. तर, २०२४ मध्ये अस्लम शेख यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी आठवी उत्तीर्ण असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे अस्लम शेख यांनी दोन वेगवेगळ्या प्रतिज्ञापत्रात निवडणूक आयोगाची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप सोमैया यांनी केला आहे. शेख यांना याचं उत्तर द्यावंच लागेल, असं सोमैया म्हणाले.
मालाड पश्चिम मतदारसंघातून २००९, २०१४ तसंच २०१९ अशा सलग तीनवेळा अस्लम शेख हे कॉंग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी कार्यरत होते. याबाबत अस्लम शेख यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यावर त्यांनी 2009, 2014, 2019 व 2024 च्या प्रतिज्ञापत्रात आठवी उत्तीर्ण असाच उल्लेख असल्याचं सांगितलं. याबाबत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील शैक्षणिक पात्रता आठवी उत्तीर्ण असं लिहिलेलं आहे. मात्र एका ठिकाणी १२ वी उत्तीर्ण असं लिहिलेलं आहे. त्याबाबत विचारलं असता कदाचित टायपिंग करताना नजरचुकीनं हे घडलं असल्याची शक्यता असावी, असं सांगण्यात आले.
मालाड पश्चिम मतदारसंघातून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. 2019 च्या निवडणुकीत मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अस्लम शेख विजयी झाले. त्यांना 79 हजारच्यावर मतं मिळाली, तर, भाजपाचे उमेदवार रमेश सिंह ठाकूर यांना ६९ हजार च्यावर मतं मिळाली होती. शेख यांनी ठाकूर यांचा पराभव केला होता.
हेही वाचा..