वर्धा - कोरोनाविरोधातील लढ्यात गांधीवादी संस्था म्हणून ओखळल्या जाणाऱ्या महिला सेवा मंडळ या संस्थेने प्रधानमंत्री सहाय्यता निधीला 25 लाखांची मदतराशी दिली आहे. रमाबहन रुईया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महिला सेवा मंडळाच्या वतीने हा २५ लाखांचा धनादेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
हेही वाचा... वॉकहार्ट रुग्णालयातील 40 नर्सना कोरोनाची लागण, जसलोकमधील कर्मचारीही क्वारंटाईन
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देशात युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे. केंद्र सरकार यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करत आहे. मात्र, देश आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचा परिचय देत, महिला सेवा मंडळ या संस्थेने आपला मदतीचा हात पुढे केला. स्वातंत्र पूर्व काळापासून विद्यादानाचे महत्वपूर्ण कार्य महिला सेवा मंडळाच्या वतीने केले जात आहे. या संस्थेचे अध्यक्ष पवन रुइया यांनी त्यांच्या मातोश्री रमाबहन रुईया यांच्या स्मृतीदिनानिमित्त कोरोनाग्रस्तांसाठी ही मदत केली आहे. पवन रुइया व पत्नी रश्मी रुइया यांनी मदतनिधीचा हा धनादेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन सुपूर्त केला.
महिला सेवा मंडळ ही संस्था महात्मा गांधी, विनिनोबाजी व जमनालाल बजाज यांच्या प्रेरणेने स्वातंत्र सेनानी व समाजसेवी स्वर्गीय रमाबहन रुइया यांच्या प्रयत्नातून निर्माण झाली आहे. यात महिला सेवा मंडळद्वारा संचालित शिशुविहार ते उच्चमाध्यमिक विद्यालये तसेच अध्यापिका विद्यालयाचा समावेश आहे. १९३५ पासून केवळ विद्यादानच नव्हे तर स्त्री सक्षमीकरण तसेच सामाजिक सेवेसाठी अग्रगण्य राहिलेली वर्धा जिल्ह्यातील महत्वपूर्ण संस्था म्हणून या संस्थेने नावलौकिक आहे.