वर्धा : नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाची निवडणूक आचार संहिता घोषित झाली आहे. याचे उल्लंघन होवू नये याकरीता निवडणूक आयोगाने भरारी पथकांचे गठण केले आहे. मंगळवारी (दि.१७) रोजी येथील स्व. वसंतराव नाईक चौकात भरारी पथकांची वाहन तपासणी सुरू होती. याच दरम्यान कापूस व्यापारी पंकज अग्रवाल हे गाडीने घेवून तळेगाव मार्गाने जात होते. पथकातील संजय दुबे यांना संशय आल्याने त्यांच्या गाडीची संपूर्ण झडती घेतली. त्यांना एका बॅगेत ६५ लाख रुपयाची रोख रक्कम आढळली. ही बातमी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसू व्यापाऱ्यांपर्यंत लागलीच पोहचली. परिणामी कापसाने भरलेली वाहने घेवून काही शेतकरी, कापूस व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह व्यापारी सुध्दा तहसील कार्यालयात पोहचले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ती रक्कम कापूस व्यापाऱ्याची : तळेगाव मार्गावर जगदंबा कॉट फायबर कंपनीने असून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला होता. त्या शेतकऱ्यांना देण्यासाठी एच.डी.एफ.सी. बँकेमधून ७० लाख रुपये काढले होते. यातील ५ लाख रुपये कार्यालयात मजुरांना देण्यासाठी पाठवले. ६५ लाख रुपये गाडीमधून तळेगाव मार्गे फॅक्ट्रीकडे घेवून जात होतो. याच दरम्यान मला ताब्यात घेतले. बँकेचे स्टेटमेंट व आवश्यक दस्ताऐवज तहसील कार्यालयात जमा केले आहे. याशिवाय बँक कर्मचाऱ्यांनी सुध्दा स्टेटमेंट दिले आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांसह व्यापारी सुध्दा अडचणीत आले आहेत. याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी माहिती कापूस व्यापारी पंकज अग्रवाल यांनी दिली आहे.
आयोगाच्या नियमानुसारच कारवाई : आचार संहिता लागू असतांना नियमानुसार १० लाखाच्यावर रोख रक्कम कुणालाही जवळ बाळगता येत नाही. भरारी पथकाला वाहनातून ६५ लाख रुपयाची रोख रक्कम मिळाली. परिणामी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कारवाई केली आहे. सध्या तरी रक्कम व वाहन जप्त केले नसून ताब्यात घेतले आहे. जिल्हाधिकारी वर्धा यांच्या आदेशाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती तहसिलदार विध्यासागर चव्हाण यांनी दिली आहे. भरारी पथकातील वरीष्ठ लिपीक संजय दुबे, पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक बांबरडे, नगर परिषद कर्मचारी शंतनू भांडारकर यांच्या पथकाने तहसिलदार विध्यासागर चव्हाण, नायब तहसीलदार स्मिता माने यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
व्यापार बंद ठेवावा लागेल : आम्हाला व्यापार बंद ठेवावा लागेल. शेतकऱ्यांना आर्वीत नगदी पैसे मिळतात म्हणून शेतकऱ्यांचा आर्वी बाजाराकडे ओढ आहे. आजुबाजूच्या नव्हेत तर बाहेर जिल्ह्याचे शेतकरी सुध्दा येथे कापूस घेवून येतात. त्यांना रोख रक्कम पाहिजे असल्यामुळे तातडीने बँकमधून रोख रक्कम काढून फॅक्टरीपर्यंत वाहतूक करुन शेतकऱ्यांचे व्यवहार पूर्ण करावे लागतात. प्रशासनाचा असा बडगा असला तर आम्ही व्यापार करावा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने योग्य काळजी न घेतल्यामुळे आचार संहितेची माहिती आमच्यापर्यंत पोहचली नाही. परिणामी आम्हाला अडचणीला पुढे जावे लागत आहे. प्रशासनाचा असाच बडगा असला तर आम्हाला व्यापार बंद करावा लागेल. असोशिएशनच्या बैठकीनंतर व उपविभागीय अधीकारी धार्मीक यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेवू. अशी माहिती व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष बिपीन अग्रवाल यांनी दिली आहे.
रोखी मुळे शेतकऱ्यांचा ओढा : शासनाच्या निमयमानुसार शेतकऱ्याला त्याच्या मालाची रक्कम २४ तासाच्या आत मिळाली पाहिजे, असा नियम आहे. या नियमाचे तंतोतंत पालन बाजार समितीच्या माध्यमातून व्यापारी करतात. मालाचे मोजमाप झाले की व्यापारी शेतकऱ्यांना त्याच वेळी रोख रक्कम देतात. यामुळे परिसरातीलच नव्हे तर बाहेर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा सुध्दा कल व्यापार पेठेकडे आहे. कोटीच्या घरात दररोजची उलाढाल होते. व्यापाऱ्यांच्या फॅक्टऱ्या शहराच्याबाहेर असल्याने त्यांना पैसे देण्यासाठी दररोज रोख रक्कम काढावीच लागते. कापूस व्यापारावर याचा परिणाम होवून शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक अशिष चर्जन व सचीव विनोद कोटेवार यांनी सांगीतले.
हेही वाचा : Mumbai Crime : साडेचार कोटींचे सोने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जप्त, अंतर्वस्त्रामधून सोन्याची तस्करी