वर्धा - 2014 नंतर बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यासाठी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी मुलाखतकाराची जबाबदारी सांभाळली आहे. जिल्ह्यातील विश्रामगृहात मुलाखती घेऊन त्यांनी इच्छुकांची मते जाणून घेतली आहेत. भाजपकडून जिल्ह्यात राजकीय नेतृत्वाची पडताळणी करण्यास सुरुवात झाली आहे.
या मुलाखतींसाठी देवळी मतदार संघातून सर्वाधिक ७ इच्छुक उमेदवार उपस्थित होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनीही इच्छुकांसोबत मुलाखत दिली. माजी जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे, सुनील गफाट, वैभव काशीकर देखील मुलाखतींना हजर होते.
हेही वाचा: वर्धा येथे 104 एकरवरील शंभर कोटींच्या मुरुमाची चोरी, समृद्धीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल
वर्धा मतदार संघात 2014 मध्ये पहिल्यांदा भाजपचे आमदार पंकज भोयर यांनी विजय मिळवला होता. यंदा इच्छुकांच्या यादीत नगराध्यक्ष अतुल तराळे, यांच्यासह सचिन अग्निहोत्रींचे नाव पुढे आले आहे. अर्चना वानखडे, माजी खासदार सुरेश वाघमारे हे देवळीसह वर्ध्यातूनही इच्छुक असल्याने मुलाखत दिली.
हिंगणघाट मतदार संघाचे आमदार समीर कुणावर यांविरुद्ध पक्षातून कोणीही इच्छुक उमेदवार नसल्याने या मतदारसंघात ते एकमेव उमेदवार आहेत. मात्र, युती झाल्यास शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्यासाठी हा मतदारसंघ राखीव ठेवला जाऊ शकतो.
हेही वाचा : आर्वी दहीहांडीच्या थरार; नागपूरचा संघ ठरला विजयी
आर्वी मतदारसंघात 2009 मध्ये दादाराव केचे हे विधानसभा निवडणूक जिंकले होते. 2014 मध्ये त्यांना थोड्या फरकाने अपयशाला सामोरे जावे लागले. मागील काही काळात पुन्हा जोमाने काम करून त्यांनी यंदा उमेदवारी मागितली आहे. तसेच नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय सुधीर दिवे यांसह सहकार क्षेत्रात काम करणारे राहुल ठाकरे यांनीही इच्छुक म्हणून मुलाखत दिली.
मुलाखतीच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक इच्छुक उमेदवार उपस्थित होते. यांसह स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनीही विश्राम गृहात हजेरी लावली.