वर्धा - वर्धात सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती घडली आहे. सहा महिन्यांपूर्वी पळून गेलेल्या मुलगा आणि मुलीचा पत्ता लागत नसल्याने संतापलेल्या मुलीचा भाऊ आणि वडिलाने मुलाच्या आईची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. ही घटना वर्ध्यातील आर्वी येथील भाईपूर पुनर्वसन येथे घडली. बेबीताई मेंढे (वय ५०) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. मुलाचे प्रेम हे आईच्या जीवावर उठल्याने या घटनेने समाजमन पुन्हा एकदा सुन्न झाले.
बेबीताई मेंढे या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याच्या कवडगव्हान येथील रहवाशी होते. ६ महिन्यापूर्वी मृत महिलेच्या मुलाचे आणि गणेश काळे यांच्या मुलीचे प्रेम प्रकरण होते. यामध्ये जातीचा भेदभाव येत असल्यामुळे दोघेही पळून गेले. त्यानंतर मुलाची आई बेबीताई मेंढे यांना याचा त्रास सुरु झाला. त्यांचे घर जाळण्यात आले. भीतीने त्यांनी गाव सोडून आर्वीत आल्या. गेल्या ४ महिन्यापासून त्या पिंपरी पुनर्वसन येथे भाड्याने राहत होत्या.
त्या महिलेला दोन मुले आणि एक मुलगी होती. मोठा मुलगा सुरज हा गेल्या सहा महिन्यांपासून गणेश काळे यांच्या मुलीला घेऊन पळून गेला. त्याचा पत्ताच लागला नाही. मुलगी कुठे आहे हेच विचारण्यासाठी काल सायंकाळी गणेश काळे आणि त्याचा मुलगा उमेश आणखी एक जण असे तिघेजण आर्वीत आले.
सुरुवातीला जुना वाद मिटवा असे सांगत चहापाणी करण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळाने मुलगा मुलगी कुठे आहे, अशी विचारणा केली. यावेळी बेबीताई मेंढे यांनी मला काहीच माहीत नसल्याचे सांगितले. यावेळी संतापून घराबाहेर येऊन शिवीगाळ केली. स्थानिक लोक जमले. एवढ्यातच उमेश याने बाहेर आलेल्या बेबीताईला घराच्या आवारातच धारदार शस्त्राने वार करत रक्तबंबाळ केले आणि तेथून पळ काढला. स्थानिक लोकांनी गणेश काळे याला पळताना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अमरावतीला नेत असताना वाटेतच बेबीताई मेंढेचा मृत्यू झाला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रकरणी हत्येसह जातीचा वाद असल्याने अॅट्रॉसिटीचा सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एसडीपीओ प्रदीप मैराळे हे करत आहे.