वर्धा - 'मी माझा बाप गमावला आहे. ज्याच्या जवळचे कोणी जाते त्यांनाच ते दुःख माहीत असते.' ही व्यथा आहे आरोग्य व्यवस्था कमकुवत ठरल्याने वडील गमावलेल्या मुलीची. वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे तैलिक महासंघाचे आंदोलन सुरू होते. यावेळी अचानक ही मुलगी येते माईक हातात घेऊन बोलायला सुरुवात करते. राजकीय आरक्षणासाठी असलेल्या व्यासपीठावर जिथे खासदार तडस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे, नगराध्यक्ष अतुल तराळे हे उपस्थित होते. तिथेच या मुलीने आपल्या भावनाना वाट मोकळी करून दिली.
सर्व सामान्य कुटुंबांना खासगी रुग्णालयाचा खर्च पेलत नसल्याने उपचार घेणे शक्य होत नाही, म्हणून सामान्य रुग्णालयाची वाट धरतात. पण, तिथेही सोयी सुविधा उपलब्ध होत नाही. शासकीय रुग्णलयात आरोग्य कर्मचारी लक्ष देत नाही. रुग्णालयात डॉक्टर तपासायला तयार नाही. सामान्य रुग्णालयाचा परिसर जणू उकीरडा झाला. याच निद्रिस्त व्यवस्थेमुळेच उपचारा अभावी 'माझा बाप गमावला, आता तरी यंत्रणेत सुधारणा करा,' असे आरोप करत आर्त हाक या युवतीने आंदोलनस्थळी दिली. यावेळी तिची व्यथा ऐकून मात्र सारेच अवाक झाले.
सामान्य रुग्णालयाची अवस्था मांडली...
सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केल्यानंतर योग्य औषधोपचार न मिळाल्यामुळे वडील गमावल्याचे शल्य मनात होते, तो राग, चीड मनात होती. कोरोनाच्या काळात वडील दवाखान्यात असतांना जो प्रसंग तिच्यावर ओढावला तो इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी या दुःखाला वेदनेला व्यक्त करत त्या मुलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
वडिलांना त्रास होत राहिला पण एक गोळी मिळाली नाही..
वडीलांना त्रास होत होता म्हणून सामान्य रुग्णालयात दाखल केले. पण, तेथे त्यांच्यावर उपचार न करता तसेच ठेवले. त्यातच त्यांना डायरिया झाला आणि संसर्ग वाढू लागला. वडील एका गोळीसाठी तडफडत होते. पण नर्स म्हणाली डॉक्टरांना विचारल्या शिवाय काहीच देऊ शकत नाही. ऑक्सिजन लावले, पण ते कधी संपले, याचीही रुग्णालयातील कर्मचा-यांना कल्पना नव्हती. ऑक्सिजन देताना डिस्टील वाटत ऐवजी बाथरुमच्या नळाचे पाणी भरल्याचे डोळ्याने पाहिले असे गंभीर आरोप तिने केला. अखेर जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. यात एकाच्या मदतीने नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत खूप उशिर झाला होता. शरिरात संसर्गाचे प्रमाण वाढल्याने आठ दिवसाच्या झुंज दिली पण अखेर हरले आणि माझा बाप गेला!’, असा हा घटनाक्रम सांगत असताना ती आपले आश्रू रोखू शकली नाही. तिची ही आपबिती ऐकून आंदोलनस्थळी काही काळ शांतता पसरली.
अखेर पोलिसांनी तिला बाजूला केले..
अखेर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला बोलण्यापासून थांबवले. तिनेही सर्वांची जाहीर माफी मागून ‘मी माझा बाप गमावला, इतरांवर ही वेळ येऊ देऊ नका’ अशी विनंती केली. हा सारा घटनाक्रम सांगताना तिने केलेले आरोप प्रचंड गंभीर होते. मृत्यूचे आकड्या संदर्भाचा विचारलेला प्रश्न विचार करायला लावणारे आहे.