वर्धा - येथील सोनेगाव आष्टा शिवारात बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास धावत्या नवजीवन एक्स्प्रेसमधून तोल जाऊन पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हे दोघेही अकोल्याचे राहवासी असून ५ मित्र रेल्वेने तिरुपतीला दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला. यात सागर बगाडे आणि सारंग नानेटकर असे मृताचे नाव आहे.
अकोला येथील ५ मित्र हे अकोला रेल्वे स्थानकावरून रात्री साडेआठ वाजता तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जायला निघाले. हे पाचही मित्र वेगवेगळ्या डब्यांमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री ११ वाजताच्या सुमारास गाडी हिंगणघाटकडे निघाली असता सोनेगाव आष्टा शिवार दोघे दाराजवळ बसल्याने तोल जाऊन पडले. हे दृश्य दिसताच काही प्रवाशांनी आरडा ओरडा सुरू केला. यामुळे झोपलेल्या तिघा मित्रांना जाग आली. त्यांनी सागर आणि सारंग यांचा शोध घेतला. पण, शोधूनही सापडले नसल्याने संशय बळावला. रेल्वे डब्यातील जीआरपीच्या पोलीस कर्मचऱ्यांना महिती देण्यात आली. हिंगणघाटला गाडी थांबताच तेथील रेल्वे पोलिसांना सोबत घेऊन शोध मोहीम सुरू करण्यात आली. जवळपास १२ ते १३ किलोमीटर रेल्वे ट्रॅक शोधल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह आढळून आले असल्याचे गणेश कुलट नामक मित्राने सांगितले. यावेळी ते मृतदेह सेवाग्राम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवल्या नंतर अकोला येथे नेण्यात आले.
विशेष म्हणजे हे दोघेही एकुलते एक असल्याचे सांगितले जात आहे. सागर बगाडे हा अकोल्यात फेसबुक नावाने कपड्याचे दुकान चालवत होता. तर सारंग नानेटकर हा रिक्षा चालक होता. या घटनेची सेवाग्राम पोलिसात नोंद आहे. तर हिंगणघाट रेल्वे सुरक्षा बालचे पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार शर्मा आणि सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचे शोध घेत रात्री उशिरापर्यंत ही शोध मोहीम पार पाडली.