वर्धा - महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात २१ जणांचा कोरोनाची लागण झाली असल्याचे पुढे आले आहे. यामध्ये 20 विद्यार्थी असून एका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात 21 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
आज 200 च्या विद्यार्थ्यांची चाचणी -
या विश्वविद्यालयातील तिघांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीत तिघांचेही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले. यात तिघात दोन विद्यार्थी, एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने खबरदारी म्हणून हिंदी विश्व महाविद्यालयात कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये ११२ विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. यात १८ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले. यामुळे पॉझिटीव्ह आलेल्यांना वसतिगृहातच विलगिकरणात ठेवण्यात आले. उर्वरित प्राध्यापक, कर्मचारी सोबतच विद्यार्थ्यांची चाचणी आज केली जाणार आहे. यादरम्यान जवळपास २०० ते २२५ जणांची चाचणी केली जाणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगितले जात आहे.
देशभारतातील अनेक राज्यातून येतात विद्यार्थी -
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात देशभारतातील अनेक राज्यातून विद्यार्थी येतात. याशिवाय अनेक जण बाहेर देशातून हिंदी भाषेचे शिक्षण घेण्यासाठी या कॅम्पसला येतात. कोरोना संक्रमण सुरू झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थी स्वगृही परतले. सध्या परिसरातील वसतीगृहात १५० च्या जवळपास विद्यार्थी आहे. यात बहुतांश विद्यार्थी हे एम.ए. पीएचडीच्या अभ्यासक्रमातील आहे. चीनमधील सुद्धा काही विद्यार्थी असून मागील वर्षात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना चीनहून आले होते. यावेळी सुद्धा 40 ते 50 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी अहवाल निगेटीव्ह आले होते. यात पॉझिटीव्ह आलेले विद्यार्थी हे वसतीगृहातील असून यावर उपाय योजना करण्याची गरज आहे.