वर्धा - नागरिकांना आपल्या घरी ये-जा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर सध्या मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिक गावाकडे आले आहे. मुंबईत वास्तव्यास असलेले अनेक जण वर्ध्यात परतले आहेत. यातील तिघांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हिंगणघाट तालुक्यातील शिरूड गावचे एक दाम्पत्य 18 मे रोजी चेंबूरहून वर्ध्यात आले. त्यांना गृह विलगिकरणात ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांच्या सह कुटुंबातील 5 व्यक्तींची 24 मे ला कोरोना चाचणी घेण्यात आली. यापैकी पती-पत्नीचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर इतर तीघे कोरोना निगेटिव्ह आहेत. रुग्णांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त मुंबईमधील सायन रुग्णालयात परीचारिकेचे काम करणारी एक 28 वर्षीय महिला 16 मे रोजी वर्धा तालुक्यातील सावंगी येथे आली. सदर महिलेच्या कुटुंबियांना गृह विलगिकरणात ठेवण्यात आले. महिलेला ताप, खोकला इत्यादी लक्षणे आढळल्यामुळे सामान्य रुग्णालायत कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. या चाचणीत सदर महिला कोरोना विषाणूने बाधित असल्याचे समोर आले. सध्या तिच्यावर सावंगी येथील विनोबा भावे रुग्णालायत उपचार सुरू आहेत.
संपर्कातील लोक विलगिकरणात
तिन्ही रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्कमधील 11 व्यक्तींचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये 8 व्यक्तींना हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय आणि 3 व्यक्तींना जिल्हा सामान्य रुग्णालायत आयसोलेशन वार्ड मध्ये ठेवण्यात आले आहे. यासह लो रिस्कमधील 6 व्यक्तींना संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले आहे.
कंटेन्मेंट झोन घोषित
हिंगणघाट तालुक्यातील शिरूड गाव हे प्रतिबंधीत क्षेत्र तर वणी, पिंपळगाव, येरणवाडी, गौळ बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. वर्धा तालुक्यातील सावंगी गावाचा काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.