वर्धा - सोमवारी राज्यभरात उत्साहात मतदान पार पडले. मात्र, आर्वी मतदारसंघाच्या कारंजा तालुक्यातील आगरगावामध्ये चक्क वाघाच्या भीतीमुळे मतदान झाले नाही. या गावामधील लोकांनी आधीच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. गावकऱ्यांना समजावण्यात अधिकाऱ्यांना अपयश आल्यामुळे, या गावांमध्ये मतदान पार पडले नाही.
वर्ध्यातील कारंजा तालुक्याचा बराच भाग हा भोर अभयारण्यापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे येथील काही गावांसाठी वाघांचा वावर नवा नाही. मात्र, 4 ऑक्टोबर रोजी वाघाच्या हल्ल्यात आगरगावातील 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर शेजारच्या सावली खुर्द गावातील बऱ्याच लोकांनाही वाघ दिसल्याने त्या गावातही भीतीचे वातावरण निर्माण झाले.
7 ऑक्टोबरला वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. वन्य प्राण्यांमुळे शेतीचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई मिळावी अशी मागणीदेखील या निवेदनात करण्यात आली होती. या मागण्या मान्य न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता.
यानंतर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच आर्वी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तहसीलदार, वन विभाग अधिकारी यांच्यासमवेत गावकऱ्यांची बैठक घेतली. तब्बल दीड तास चाललेल्या या बैठकीमध्ये जिल्हा प्रशासनाला सावली खुर्द गावाचा बहिष्कार मागे घेण्यात यश आले.
याआधी केलेल्या मागणीनंतरही वाघाचा वावर तसाच सुरु राहिला. वाघाने काही पशूंवर हल्लादेखील केला. त्यामुळे 19 ऑक्टोबरला आगरगावच्या ग्रामस्थांनी वाघाचा बंदोबस्त करण्यासह पिकांची नुकसानभरपाई मिळावी, शेताला कुंपण द्यावे, तसेच शेतीसाठी दुपारी वीजपुरवठा करावा अशा मागण्या केल्या होत्या. उपवनसंरक्षक शर्मा यांसोबत चर्चा करूनही यासंदर्भात कोणतीही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे, माजी सरपंच विलास किनकर यांनी सांगितले.
हेही वाचा : वर्ध्यात मेणबत्ती लावून पार पडले मतदान; वादळी वाऱ्याचा फटका