वर्धा - वर्ध्यात कोरोनाबाधित महिलेचा सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात 62 वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर तिचा अंगावर असलेले सोन्याचे दागिने गायब झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्ध्याच्या आर्वी शहरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 62 वर्षीय महिलेचा 30 जुलैला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तिला उपचारासाठी सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयातील कोविड वार्डमध्ये भरती करण्यात आले. रुग्णालयात असताना एक ऑगस्टला महिलेच्या अंगावर सोन्याचे दागिने असल्याचा फोटो आहे. पण दुर्दैवाने 2 ऑगस्टला महिलेने शेवटचा श्वास घेतला. याची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. 3 ऑगस्टला कोरोनाग्रस्त असल्याने तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आला.
मृत महिलेचे वस्तू देताना केवळ मोबाईल परत देण्यात आला. यावेळी अंगावर असलेले हात, गळा आणि कानातील दागिने नसल्याचे सांगण्यात आले. गृहविलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर आईचे दागिने गायब असल्याची तक्रार सेवाग्राम पोलिसात दिली. ही तक्रार गायब झालेले सोनं मिळावे म्हणून नाही. तर यापुढे असे प्रकार होऊ नये, यासाठी तक्रार केल्याचे अजयने ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना सांगितले.
घडलेल्या प्रकारची चौकशी पोलीस करतीलच. पण पुढे असा प्रकार होऊ नये, यासाठी एसओपी ठरवण्यात आली आहे. यानंतर रुग्णलयात भरती होताना मौल्यवान वस्तुची नोंद घेऊन एक लिस्ट करून सही घेतली जाणार आहे. परत जाताना त्यांची नोंद तपासून पुन्हा सही घेतली जाईल, अशी माहिती महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे वैदकीय अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे यांनी ‘ईटीव्ही भारत’ला दिली.
यात मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. दागिन्याचे काय झाले? याची चौकशी केली जाईल, असे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी सांगितले.