वर्धा - भुगाव परिसरात असलेल्या उत्तम स्टील कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या वसाहतीत 31 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत मृत महिलेने तिचा पती आशिष साहूला 'मी मरत आहे' असा व्हॉईस मॅसेज पाठवला होता. पतीने मोबाईल चेक केला असता लागलीच कंपनीतून घरी गेले. मात्र दार तोडले असता मृतदेह आढळून आला. महिलेने मृत्यूपूर्वी 3 वर्षीय आयुष आणि 9 वर्षीय ओरा ची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सविता साहू असे मृतक महिलेचे नाव आहे. घटनास्थळी प्रसार माध्यमांना जाण्यास कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केला आहे.
शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. पती कामात असल्याने मोबाईल पहायला उशीर झाला. जेव्हा मॅसेज ऐकला तोपर्यंत उशीर झाला होता. आशिष साहु यांना घराचा दरवाजा बंद असल्याने दार तोडून आतमध्ये शिरले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. यावेळी वसाहतीच्या गेटवर कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी विविध कारणे सांगत माध्यम प्रतिनिधींना आतमध्ये जाण्यास मज्जाव केला. महिलेने आत्महत्या का केली याचा खुलासा अद्याप झाला नाही. तसेच पतीचे बयाण आणि मृतक सविता साहू यांचे कुटुंबीय आल्यावर आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल. मुलांचा मृत्यू कसा झाला हेही अद्याप स्पष्ट नाही. त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. यात पोलीस तपासात काय पुढे येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.