वर्धा- काँग्रेसची एक मजबूत विचारधारा आहे. जी न संपणारी आहे. यात एखादा नेता विचारधारा सोडून काँग्रेस बाहेर पडला, म्हणून काय काँग्रेसची विचारधारा संपत नाही. दीडशे वर्ष झालीत, अजूनही काँग्रेस टिकून आहे. काँग्रेस संपवण्याचा संकल्प अनेकांनी करून पाहिला, पण ते त्यांना शक्य झाले नाही. आम्ही काँग्रेस विचारांची माणसे निवडणुकीत निवडून आणून पक्ष अजून मजबूत करू, असे महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले.
वर्ध्याच्या सेवाग्राम येथे आयोजित कार्यक्रमानंतर केदार पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यानी हे विधान केले. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर मुरैना आणि ग्वालियर या दोन जिल्ह्याच्या निवडणूक समन्वयक पदी महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वीं बिहार राज्यात निवडणूक समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांना मुरैना जिल्ह्यांतर्गत जौरा, सुमावली, मुरैना दिमनी यासह अंम्बाह आणि ग्वालियर जिल्ह्यातील ग्वालियर, पूर्व ग्वालियर आणि डबरा या विधानसभा क्षेत्र समन्वयक म्हणून ते मध्यप्रदेशच्या पोटनिवडणुकीत सक्रिय असणार आहे. सदर भाग ज्योतिरादित्य सिंधिया यांचा प्रभावी विधानसभा भाग असल्याने ज्योतिरादित्य सिंधिया यांनाच आव्हान देत काँग्रेस पक्षाला निवडणुकीत भरघोस मताधिक्य मिळवण्यासाठी पक्षाच्या वतीने बांधणी करावी लागणार आहे.
दरम्यान, काँग्रेस सोडून गेलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांचे नाव न घेता, एखाद्याने पक्ष सोडला म्हणून विचारधारा संपत नाही, असा केदार यांनी टोला हानला.
हेही वाचा- वर्धा शहरातील सर्कस ग्राउंड परिसरातून देशी कट्टा जप्त, एकाला अटक