वर्धा : आजारपणाने मृत्यू झालेल्या मुलीचा मृतदेह आई-वडिलांनीच घरातच पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर ज्या ठिकाणी मुलीचा मृतदेह पुरला होता, त्या ठिकाणी मुलीचे वडिल लाकडी फळी टाकून झोपले होते. घटनेच्या 10 दिवसांनंतर ही भीषण घटना उघडकीस आली आहे. प्रविणा (वय ३७) असे मृत महिलेचे नाव असून ती आदर्श नगर येथील रहिवासी होती. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी मृत मुलीच्या आई, वडीलांसह भावाला ताब्यात घेतले आहे.
पैसे नसल्याने घरातच अंत्यसंस्कार : याबाबत अधिक माहिती अशी की, मयत प्रविणा ही गेल्या काही महिन्यांपासून आजाराने त्रस्त होती. ती कधीच घराबाहेर गेली नव्हती. तसेच प्रवीणाचा 3 जुलै रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घरी मृत्यू झाला होता. आता अंत्यसंस्कार कोण करणार, पैसे कुठून आणणार, असे अनेक प्रश्न कुटुंबाला भेडसावत होते. त्यामुळेच त्यांनी मुलीचा मृतदेह घरीच पुरला. तसेच मुलगी प्रविणाचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता त्या ठिकाणी वडील साहेबराव हे लाकडी फळ्यावर झोपायचे. प्रविणाचा भाऊ त्यांच्या बाजूला बेडवर झोपला होता. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन : ज्या ठिकाणी मृतदेह पुरला होता त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुमारे अर्धा तास खोदकाम करण्यात आले. त्यानंतर प्रविणाचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. रात्रीची वेळ असल्याने लाईटच्या उजेडात मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूंकडून घटनास्थळीच करण्यात आले. जवळच्या स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.
घटनेनंतर उलटसुलट चर्चेला उधाण : भस्मे कुटुंबीय वेडे असल्याने कोणाशीही बोलत नव्हते. वडील, भाऊ रोजंदारीवर काम करत होते. त्यानुसार 3 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशीच प्रविणाचा मृत्यू झाला, अशी उलटसुलट चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून वैद्यकीय अहवालानंतरच सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत.