वर्धा - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात मंगळवारी कामकाज पार पडले. यावेळी प्रत्यक्षदर्शीनंतर पीडित प्राध्यापिकेवर उपचार करणारे डॉक्टर आणि तसेच पीडिता शिकवत असलेल्या महाविद्यालयातील मुख्याध्यापिकेची साक्ष नोंदवण्यात आली. तर आतापर्यंत 11 जणांची साक्ष नोंदण्यात आली असून उर्वरित साक्ष बुधवारी न्यायालयापुढे नोंदवली जाणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली.
अडीच तास उलटतपासणी -
हिंगणघाट न्यायालयात जळीतकांड प्रकरणाचे कामकाज आज सकाळी ११ वाजता न्यायाधीश आर.एन.माजगावकर यांच्या न्यायालयात सुरु झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत हे काम काज चालले. सरकारी पक्षातर्फे उज्वल निकम यांनी भाग घेतला, तर बचाव पक्षातर्फे भूपेंद्र सोने यांनी न्यायालयात बाजू मांडली. जानेवारी महिन्यात चाललेल्या कामकाजात कार्यकारी दंडाधिकारी विजय पवार यांची उलटतपासणी बाचाव पक्षाकडून होणे बाकी होते. त्यांची अडीच तास उलटतपासणी करण्यात आली.
काय आहे प्रकरण -
वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाटमधील नांदोरी चौकात प्राध्यापिकेला आरोपी विकी नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे हिंगणघाट हादरून गेले होते. सात दिवस पीडित तरुणीवर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट : रुग्ण संख्येत वाढ; मंगळवारी 3663 नवीन रुग्ण, 39 मृत्यू