वर्धा - वर्धा ही महात्मा गांधी आणि विनोबा भावेंची कर्मभूमी राहिली आहे. आयुष्यातील महत्वाचा कालखंड सेवाग्राम आणि पवनार आश्रमात घालवला असल्याने वर्ध्याला जागतिक पातळीवर ओळख लाभली आहे. ही ओळख कायम राहावी यासाठी सर जे जे स्कुल ऑफ आर्टच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी चक्क टाकाऊ साहित्यातून महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे शिल्प साकार केले आहे. चरखा घर परिसरात शिल्पाचे मांडणी करण्यात आली आहे.
वर्ध्याला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती वर्ष आणि विनोबांचे 125 जयंती वर्ष साजरे करण्यात आले. या निमित्ताने सेवाग्राम विकास आराखड्यात अनेक कामे करण्यात आले. यात शहरातील विविध भागात गांधीजी आणि विनोबांची ओळख व्हावी, बाहेरून येणाऱ्याला ते दिसावे अशा पद्धतीने गांधीयन थीम मांडण्यात आली. चौका-चौकात सौंदर्यीकरण करण्यात आले.
60 टन टाकाऊ साहित्यातून 40 टनांची निवड करत शिल्प निर्मिती
महात्मा गांधींच्या विचाराला अनुसरून कुठलीच वस्तू निकामी नसते. याच विचारला धरून त्यात वाहनाचे टाकाऊ साहित्यातून शिल्प घडण्याचे ठरले. यासाठी मुंबईतील जवळपास 60 टन निवडक साहित्य शोधून आणण्यात आले. यातील 40 टन भंगार साहित्य शोधून शारीरिक रचने प्रमाणे लावण्यात आले. यात हे जवळून ओबड-धोबड वाटत असले तरी त्यात जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न या कुठेच कमी राहिले नाही. चेहऱ्यावर हाव-भाव आसो की डोळ्यातील जिवंतपणा दूरवरून नजरेत भरतो.
डोळ्यात भरणारी उंचीपण सौंदर्य दुरूनच
महात्मा गांधींच्या हातात काठी असणारे हे शिल्प 31 फूट उंच आहे. यात सुरुवातीला शरीर रचना आणि एक-एक तुकडा शोधून कापून हे या कलाकृतीला आकार देण्यात आला आहे. टाकाऊ वस्तूचे हे सुंदर शिल्प साकारले आहे. याचबरोबर आचार्य विनोबा भावे यांचेही शिल्प साकरण्यात आले आहे. भावे यांचेही 19 फुटांचे हे शिल्प आहे. पवनार आश्रमासमोरून वाहणाऱ्या धाम तीरावर बसलेले स्मित हास्य असणारे हे शिल्प आहे. वाहनांचे जुने लोखंडी साहित्यापासून बनवले हे शिल्प पाहून कोणाला विश्वास बसणार नाही. या अंगावरील बारीक छटा जवळूज दिसत नसल्या तरी याच साहित्यातून या छटांचे हे शरीर रचना, अंगावर वस्त्र, चेहऱ्यावर असणारा भाव निर्माण करण्यासाठी 9 महिने लागले. अनेक रात्री जागत हे शिल्प साकारण्यात आले आहे.
विनोबा यांनी शालेय जीवनात सर जे जे स्कुलची चित्रकला स्पर्धेत घेतला होता सहभाग
विनोबा भावे यांनी शालेय जीवनात शिकताना सर जेजे स्कुल ऑफ आर्ट महाविद्यालयाच्यावतीने आयोजित परीक्षा दिली होती. याचा अभिमान असल्याचे मत डीन प्रा. विश्वनाथ साबळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हे शिल्प तयार करताना सर जेजे स्कूलचे प्रा. प्रशांत इपते, प्रा. यशवंत भावसार यासह अनेक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
हेही वाचा - न्यायाधीशांच्या बंगल्यात सापडले चोरीचे मोबाईल!