वर्धा- जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. मात्र, जिल्ह्यात याचा एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला होता. मात्र, आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेचा मृत्यनंतर तीचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
हेही वाचा- केईम रुग्णालयातील 'त्या' व्हायरल व्हिडिओचा अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मागवला
जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. नव-नवीन उपाययोजना राबवल्या. भाजीपाला किंवा इतर साहित्यातून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बाहेरच वाहनतळ तयार करण्यात आले. यामुळे बाहेरुन येणाऱ्या नागरिकांवर रोख बसला.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गावबंदी केली. यांसह कोणी गावात शिरताच आरोग्य यंत्रणेला माहिती दिली जात आहे. कोरोनाबाबत नागरिक जागरुक आहेत. पण या सगळ्यात तिसऱ्या टप्प्यात ग्रीन झोन असल्याने सवलती मिळायला सुरवात झाली होती. मात्र, त्यातच मृत महिलेचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचा पती दारू विक्री करत असल्याची चर्चा आहे. त्याच्या संपर्कात बाहेरील जिल्ह्यातील व्यक्त आले असावेत. त्यातूनच संबधित महिलेला कोरोनाची लागण झाली का याची तपासणी केली जात आहे. दरम्यान बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कामुळे त्या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचा संशय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता झोपाटे यांनी व्यक्त केला आहे.