वर्धा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भविष्यात संधी मिळाली तर वर्ध्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचवेळी आपण सध्या तरी असा विचार करत नाही. तुम्ही चिंता करु नका, असे सुळेंनी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांना सांगितले.
सुप्रिया सुळे वर्ध्यातील राज्यस्तरीय मुख्यध्यपकाच्या अधिवेशनात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी पवनार बद्दल बोलून दाखवले. सावंगी येथे हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
हेही वाचा - वर्ध्याच्या वाघदऱ्यातून बिबट्याच्या शिकारप्रकरणी सात जणांना अटक
यावेळी सुळे म्हणाल्या, बारामतीकरांना आवडणार नाही मी बोललेले. कारण, माझी राजकारणात आणि समाजकारणात जी ओळख आहे ती बारामतीमुळे आहे. मला जर कधी चॉईस द्यायची वेळ आली आणि बारामतीमध्ये दुसरा खासदार उभा राहिला. तर, सर्वात जास्त आवडणारा मतदारसंघ मला वर्धा आहे. हा जिल्हा लहान वाटत असला तरी माझासाठी मोठा जिल्हा आहे. मात्र, मी काही आताच निवडणूक लढणार नाही, असे म्हणत त्यांनी खासदार तडस यांना चिमटा काढला.
हेही वाचा - महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर, सरकारने श्वेतपत्रिका काढावी - सुप्रिया सुळे
मी ज्या दिवशी 60 वर्षाची होईल त्या दिवशी महिन्यातले 10 दिवस पवनार आश्रमात राहील, असे मुलांना सांगत असल्याचे त्या म्हणाल्या. विनोबाजींचे संस्कार माझ्यावर झाले आहेत, पुढेही होत राहतील. दरवेळेस मी जाते तेव्हा ही वास्तू आणि विचार नवीन वाटत असते. हे विचार पुढल्या पिढीत पोहचविण्यात आपण कमी पडत आहोत, हा जिल्हा माझ्यासाठी इमोशनल जिल्हा आहे, असेही त्या म्हणाल्या. पवार घराण्याचे माजी खासदार दत्ता मेघे यांच्याशी असलेल्या संबंधाचाही त्यांनी भाषणात उल्लेख केला.
कार्यक्रमाला खासदार दत्ता मेघे, खासदार रामदास तडस, आमदार विक्रम काळे, आमदार पंकज भोयर आणि आमदार दीपकराव दौंदल उपस्थित होते.