वर्धा - जिल्ह्याच्या आर्वी परिसरातील शेतात ऊसाने पेट घेतला. ही आग शॉर्टसर्किटमुळे निघालेल्या ठिणगीतून लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी दुपारी ही आग लागली असून यात ऊस जळून खाक झाला आहे.
हेही वाचा - 'अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील गैरकारभार लपवण्याचे शिक्षण विभागाचे प्रयत्न'
या आगीत जवळपास तीन एकरातील ऊस जळाले आहे. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. दशरथ बळगे असे शेतमालकाचे नाव आहे. तब्बल दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
तीन एकरात ऊसाची लागवड केली होती. वर्षभर संगोपन केलेला ऊस अवघ्या काही तासात जळून खाक झाला. ऊसाला आग लागल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येताच विद्युत विभागाला माहिती देत विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यानंतर हिंगणघाट येथून अग्नीशामक गाडीला पाचारण करण्यात आले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
या आगीत दशरथ बळगे या शेतकऱ्यांचे जवळपास तीन ते चार लाखांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच गिरड पोलीस ठाण्याचे कर्मचारी अनुप टपाले, वसिम शेख, नरेंद बेलखेडे, राहुल मानकर यांनी घटनास्थळ गाठून नुकसानीचा पंचनामा केला.
शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.