वर्धा - सॅम पित्रोदा बुद्धिमान व्यक्ती आहेत असा आपला समज होता. परंतु एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करून ते पाकिस्तानची भाषा बोलत होते. त्यावरुन त्यांच्या मेंदूचा कंट्रोल पाकिस्तान तर करत नाही ना?, असा प्रश्न मनात येतो. असे वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना केले. ते वर्ध्यात भाजप उमेदवाराचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते.
येडियुरप्पांच्या डायरी प्रकरणावर उत्तर
येडियुरप्पांच्या डायरीविषयी उत्तर देताना मुनगंटीवारांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले. डायरी मिळेल तेव्हा त्याची चौकशी करुन सत्यता तपासली जाईल. यामध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तीला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. परंतु काँग्रेसने खोट्या पत्रकार परिषदा घेऊन 'राईच्या फोटोचा पर्वत' बनवू नये. सत्तेसाठी किंवा विजयासाठी या मुद्द्याचा उपयोग केला तर फायदा होणार नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.
पित्रोदांचे वक्तव्य वैयक्तिक, काँग्रेसच्या चारुलता टोकस यांचं स्पष्टीकरण
पित्रोदांचे वक्तव्य हे वैयक्तिक असून पक्षाचे मत नाही, असे काँग्रेसच्या वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार चारुलता राव टोकस यांनी सांगितले. आम्ही आमच्या जवानांना सर्वोच्च मानतो, पुलवमासारखी घटना कधीच व्हायला नको आणि त्यासाठी जे जबाबदार असतील त्यांच्याचर कठोर कारवाई व्हायला हवी, असेही टोकस म्हणाल्या.