वर्धा - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. काही ठिकाणी नागरिक सहकार्य करत आहेत. मात्र, काही हौशी लोकांविरोधात कठोर पावले उचलावी लागत आहे. उपविभागीय अधिकरी हरीश धार्मिक यांनी प्रशासकीय उपाययोजनांबद्दल माहिती दिली आहे. तसेच आतापर्यंत प्रशासनाने केलेल्या कारवाई संदर्भात त्यांनी माहिती दिली.
भाजी बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी शहरातील शाळांच्या मैदानावर बाजार भरवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये गांधी विद्यालय, कन्या शाळा, मॉडेल हायस्कूल, कन्नमवार हायस्कूल आणि सहकार मंगल कार्यालयाचे मैदान यांचा समावेश आहे. मोठ्या मैदानामुळे सोशल डिस्टन्सिंगसाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्वीतील नॅशनल ट्रेडर्स हे सिमेंट वाहतूक करत असल्याचे निदर्शनास त्याच्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये उपविभागीय अधिकारी यांनी 50 हजाराचा दंड दुकान चालक हाफिजुद्दीन बोहरा याला पन्नास हजारांचा दंड लगावला आहे. तसेच त्याची वसूलीदेखील करण्यात आली आहे.
टवाळखोर सावधान! दुचाकी ढकलावी लागणार...
काही टवाळखोर वाहनाने फिरत असल्याचे आढळून आल्याने त्यांना दुचाकी ढकलायला लावत विषयाची गंभीरता समजावण्याचा प्रयत्न केल्याचे एसडीओ धार्मिक यांनी सांगितले. यापुढे जाणीवपूर्वक फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे, ते म्हणाले.