सेलू (वर्धा) - तालुक्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळताच तात्काळ दखल घेत रोखण्यात आला आहे. सेलू तालुक्यातील आकोली परिसरातील ही घटना आहे. गावात विवाहाची पूर्ण तयारी झाली असताना ऐनवेळी पोहचून बालविवाह रोखण्यात यश मिळाले. विशेष म्हणजे या सहा महिन्यात जिल्हा बालसंरक्षण कक्षाने आतापर्यंत 5 बालविवाह थांबविले आहेत.
सेलू तालुक्यातील आकोली येथे 1 जुलैला बाल विवाह होणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, सेलू पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कापसे यांनी सेलू तालुक्यातील आकोली गावाला भेट दिली. गावतील बाल संरक्षण समितीचे सदस्यांसोबत विवाह असलेल्या घरी भेट देऊन वर आणि वधू कुटुंबियांना समजावून सांगण्यात आले. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा मुलीच्या पालकांकडून लिहून घेण्यात आले. गावकरी आणि पालकांना मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करू नये, असे सांगण्यात आले. बाल विवाहातून होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जागृती सुद्धा करण्यात आली.
जिल्ह्यात प्रत्येक गावात बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीचे अध्यक्ष सरपंच असून अंगणवाडी सेविका सदस्य सचिव आहेत. समितीच्या माध्यमातून गावात बालकांचे हक्क, त्यांच्यासाठी असलेले विविध कायदे, शारीरिक हिंसा, पोक्सो याबाबत सतत माहितीचा प्रचार प्रसार सुरू आहे. सक्रिय बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून गावातील माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षाकडे पाठवली जाते. त्यामुळे गावातील बाल संरक्षण समिती बालकांवरील अत्याचार थांबविण्यात महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.
यावेळी गावातील बाल संरक्षण समितीचे सदस्य व उपसरपंच रणजीत देवढे, माजी पोलीस पाटील साहेबराव चोपडे, सचिव रंजना गोमासे, अंगणवाडी सेविका नलिनी गोमासे, दिलीप पिंपळे, कृष्णा माने, भारती बावणे, संगीता पिंपळे, पल्लवी बुधबावरे व गावातील नागरिक तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे वैशाली मिस्किन, महेश कामाडी, सुनंदा हिरुडकर, राम सोनवणे, मेघलता तमगिरे, आरती नारंजे, अक्षय महालगावे, अमर कांबळे यांनी विवाह थांबविण्यासाठी प्रयत्न केले.
हेही वाचा - पुलगावात पत्नीची हत्या करून सैनिकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या?