वर्धा - पोलीस हे नेहमी समाजात शांतता सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी झटत असतात. सध्या कोरोनाच्या लढ्यात रस्त्यावर अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलीस विभागावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र दिनी वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांसह 6 पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या हस्ते करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांना पोलीस महासंचालक चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. गडचिरोलीच्या नक्षलभागात घनदाट जंगलात नक्षल्यांसोबत 300 राउंड फायर करणारी चकमक. यासह मागील वर्ष भराच्या काळात एलसीबीची जवाबदारी संभाळताना क्लिष्ट तपासात केलेली कामगिरी. थरारक घटनेत तपासला दिशा नसताना अनेक प्रकरणांचा बारकाईने तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट करून घेण्याची केलेली त्यांची कामगिरी मोलाची ठरणारी होती.
सध्या आफ्रिकेत भारतीय दूतावासात कार्यरत असणाऱया आणि सायबर गुन्ह्यातील क्लिष्ट प्रकरणाच्या तपासात केलेल्या कामगिरीसाठी पोलीस कर्मचारी कुलदीप टांकसाळे यांचा सन्मान करण्यात आला. महिला पोलीस हवालदार सत्यभामा लोणारे यांचा महिला तक्रार निवारण कक्षात मागील 15 वर्षात केलेल्या चांगल्या कामगिरीसाठी गौरव करण्यात आला. देवळी पोलीस स्टेशनला कार्यरत परवेज खान यांचाही सत्कार करण्यात आला. पोलीस मुख्यालयातील महिला कर्मचारी शाहीन सय्यद, दर्शना वानखेडे आणि दयाल धवणे यांनी खेळात राष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व सिद्ध करत वर्धा पोलीस दलाचे नाव उंचावण्याची कामगिरी केल्याने त्यांचाही गौरव करण्यात आला.