वर्धा- देवळी येथील एमआयडीसी परिसरात महालक्ष्मी कंपनीच्या गेटसमोर चिमुकल्यांनी आंदोलन केले. कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे होत असलेल्या प्रदूषणाने देवळीकरांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे. कंपनीतून सोडण्यात येणारा विषारी वायू चिमणीतून न सोडता तो प्लांट लेव्हलवर सोडली जात आहे. यामुळे देवळीकरांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. यासाठीच चिमुकल्यांनी आंदोलन करत आम्हाला मोकळा श्वास पाहिजे, अशी मागणी लावून धरली.
देवळीच्या महालक्ष्मी स्टील कंपनीने पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले असल्याचा आरोप केला जात आहे. नियमानुसार कंपनीतून निघणारा धूर हा चिमणीच्या सहाय्याने सायंकाळी उंचावर सोडला जाणे अपेक्षित आहे. पण, महालक्ष्मी कंपनीच्या वतीने तसे न करता बरेचदा भर दिवसा धूर प्लांट उंचीवर सोडला जातो, असा आरोप आहे. या धुरामुळे अनेकांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी युवा संघर्ष मोर्चाच्यावतीने करण्यात आली होती. आज लहानग्यांनी हातात फलक घेत आम्हाला कंपनीचा विरोध नाही, पण प्रदूषण टाळा, आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्या, असे फलक घेत प्रदूषणाचा विषय मांडला. चिमुकल्यांचा हा निर्धार कुठपर्यंत यशस्वी होतो हे पाहावे लागेल. पण, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी होऊन सुद्धा मंडळ मुंग गिळून गप्प का, असा सवाल देवळीकर करत आहेत.
हेही वाचा- वर्ध्यात साधेपणाने नवरात्री उत्सावाची सुरुवात, ८२५ मंडळात घटस्थापना