वर्धा - महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण म्हणून वर्धा जिल्हा ओळखला जातो. वर्ध्यातील गांधीजींच्या नावाने असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'हिंदी विश्व विद्यालय' हे नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. विद्यापीठ प्रशासनाने आचारसंहितेचे कारण पुढे करत सहा विद्यार्थ्यांचे निलंबन केले आहे.
मात्र, यामागे अनेक कारणे असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केले. या सहा विद्यार्थ्यांचे निलंबन मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. विद्यापीठ बहुजन नायक कांशीराम यांची जयंती साजरी करण्यात येणार होती. यासाठी विद्यापीठाला रितसर परवानगी मागितली गेली. मात्र, आचारसंहितेचे कारण पुढे करत या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली.
हेही वाचा - भुसावळ विधानसभा मतदारसंघ : राजकीय वर्चस्वाच्या लढाईत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
या जयंती कार्यक्रमादरम्यान देशभरात सुरू असलेल्या मॉब लिंचिंग आणि काश्मिर विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींना विद्यार्थी पत्र लिहणार होते. याची माहिती विद्यापीठ प्रशासनाला लागली. त्यामुळेच आचारसंहितेचे कारण पुढे करत विद्यापीठ प्रशासनाने परवानगी नाकारली.
विद्यार्थी गांधी हिलकडे जाण्याचा तयारीत असताना कडक बंदोबस्त लावून विद्यार्थांना थांबवण्यात आले. या विरोधात विद्यार्थ्यांनी धरणे दिले. यातील सहा विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - जीएसटी हा देशाचा कायदा, त्यावर टीका अयोग्य - निर्मला सीतारामन
चंदन सरोज, निराजकुमार गांधी, राजेश सारथी, रजनीश आंबेडकर, पंकज वेला, वैभव पिंपळकर अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. गांधींच्या नावाने असलेल्या विद्यापीठात गांधीवादी मार्गाने केलेल्या आंदोलनाचा विरोध करून, ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषद घेऊन निलंबन मागे घेण्याची मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
आम्ही आचारसंहितेचा भंग केलेला नाही, करण विद्यापीठात आचारसंहिता लागू होत नाही. निलंबनाचा हा आदेश मागे घ्यावा. संविधानाने दिलेल्या हक्कावर गदा आणणारा व्यक्ती विद्यापीठात राहण्याच्या योग्य नसल्याचे चंदन सरोज या विद्यार्थ्याने म्हटले.