वर्धा - समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील एका व्यक्तीचा बिबट्याच्या हल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. कोठेराव रामभाऊ टिपले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. लॉकडाऊनमुळे टेलरिंगचा व्यवसाय बंद पडल्याने टिपले यांनी शेळी पालनाच्या व्यवसाय सुरू केला होता. मंगळवारी दुपारी शेळ्या चारण्यासाठी वन परिसरात गेले होते. त्यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात टिपले यांचा बळी गेला.
कोठेराव रामभाऊ टिपले हे गावात छोटासा टेलरींगचा व्यवसाय करायचे. पण लाॅकडाऊनमुळे दुकान बंद पडले. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून जवळपास 50 शेळ्या घेऊन ते रोज चारायला घेऊन जात होते. बुधवारी नेहमी प्रमाणे टिपले हे शेळ्या घेऊन चारयला गेले असता, गावापासून काही अंतरावर असलेल्या सागवानाच्या झाडीत दडून बसलेल्या बिबट्याने टिपले यांच्यावर हल्ला केला. या हल्लात टिपे यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान टिपले हे सायंकाळी घराकडे परतले नसल्याने त्यांचा मुलगा शैलेशने त्यांना फोन लावून संपर्क साधला. मात्र, वडलांचा कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुलगा शैलैश स्वतः शिवारात वडिलांना पाहण्यासाठी गेला. त्यावेळी गावालगतच्या सागवानाच्या झुडपांमध्ये शेळ्या आढळून आल्या. मात्र, त्याचे वडील दिसले नाहीत. त्यानंतर शैलशने परिसरात शोधाशोध केली असता, सय्यद पटेल यांच्या पडिक जमिनीवर टिपले हे रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आले.
बिबट्याचा हल्ला; वनविभागाकडून पाच लाखाची मदत
या घटनेची माहिती पोलीस स्टेशन समुद्रपुरला दिली. घटनास्थळी ठाणेदार हेमंत चांदेवार कर्मचाऱ्यांसह घटना स्थळी दाखल झाले. परंतु प्रेताची पाहणी केली असता, गळ्यावरील जखमा पाहून वन्य प्राण्याने हल्ला केल्याचा अंदाज आला. यामुळे पोलिसांनी तत्काळ या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर यांना दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या बोरकर यांनी पाहणी करून वरिष्ठांना माहिती दिली. या परीसरात बिबट्या असल्याची माहिती होती. यामुळे हा मृत्यू बिबटच्या हल्ल्यात झाल्याची पुष्टी झाली. यामुळे उपवनसंरक्षक राकेश शेपट यांना सदर टिपले कुटुंबांना पाच लाखाची मदत जाहीर करीत तसे पत्र पाठवून नातेवाईकांना सांगितले.