वर्धा- आज मोठ-मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांवर कर्ज आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन म्हणतात, कारखानदारी चालविण्यासाठी मोठी रक्कम देऊन मदत करणार. या घराण्यांनी मोठ्या प्रमाणात घेऊन ठेवलेल्या कर्जामुळे बँका संकटात आल्यात. हे कर्ज फेडून आता बँकांना मदत करणार आहेत. 81 हजार कोटींची कर्ज केंद्र सरकार भरणार आहे. शेतकऱ्यांचे कर्ज थकले तर त्यांच्या घरावर जप्ती आणतात. मोठ्यांचे कर्ज सरकार भरणार आहे. हे राज्य सामान्य लोकांसाठी नाही. तर मोठ्या लोकांसाठी आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. हिंगणघाट मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजू तिमांडे यांचा प्रचार सभेत पवार बोलत होते.
हेही वाचा- मुख्यमंत्री हे मैदानातून पळ काढलेले पैलवान - विजय वडेट्टीवार
मागील काळात महाराष्ट्राच्या गुन्हेगारीचा ग्राफ कमी होता. मुख्यमंत्री विदर्भातील आहेत. त्यांनी गृहमंत्री खाते स्वतःकडे ठेवले. मात्र, त्यांच्याच शहराची ओळख गुन्हेगारीचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवले जात आहे, अशी टीका पवारांनी केली.
महाराष्ट्र खड्डे मुक्त म्हणून ओळखल्या जायचा त्या महाराष्ट्राला आता खड्डे युक्त महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जात आहे. प्रत्येक शहराला जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डेच-खड्डे आहेत. मागील पाच वर्षांच्या काळात या सरकारने राज्याचे चित्र बिघडविण्याचे काम केले आहे. उद्योग, कायदा, सुव्यवस्था, अशा गोष्टींमध्ये महाराष्ट्र अग्रेसर होते. पण, आता हे चित्र राहिलेले नाही. पाच वर्षांच्या काळात फडणवीस आणि सरकारने राज्यावर चार हजार कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेवले. यातील किती रक्कम विकासावर खर्च झाली, याबाबत न बोललेले बरे. सरकारने शेतमालाचे भाव वाढतील, याबाबत काळजी घेतलेली नाही. विरोधात असताना सात हजार रुपये प्रती क्विंटलचा भाव कापसाला मागायचे. आता सत्ता असताना किती वेळा शेतकऱ्यांना हा भाव मिळाला, याबाबत निर्णय का घेतला नाही ? शेतीला लागणारी खते, औषधी, अवजारे यांच्या किमती वाढत आहेत. पण, शेतमालाचे भाव मात्र काही वाढत नाहीत. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, असे पवार म्हणाले.