वर्धा - आर्वी तालुक्यातील मोरांगणा-खरांगणा येथील जवान आर्मीमध्ये कार्यरत होता. हृदयविकाराच्या धक्क्याने पुणे येथील कमांडो रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भूषण दांडेकर असे या जवानाचे नाव आहे. मोरांगणा या मुळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास शहीद स्मारक परिसरात अंत्यसंस्कार करावे अशी इच्छा भूषणने त्यांच्या मित्रांजवळ व्यक्त केली होती. त्यामुळे अंतिम इच्छेप्रमाणे शहीद स्मारक परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी सेनेतील अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी भूषणला साश्रुनयनाने अखेरचा निरोप दिला.
रुग्णवाहिकेने भूषणचे पार्थिव गावात आणण्यात आले. यावेळी अंतिम दर्शनासाठी गावातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. लहान भाऊ रोशनच्या हस्ते मुखाग्नी देण्यात आली. प्रसंगी पुलगाव येथील पथकाने मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, खासदार रामदास तडस, आमदार दादाराव केचे, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. शिल्पा खरपकर आणि सैनिक कल्याण संघटक उपस्थित होते. मराठा लाईट इन्फ्रन्ट्रीच्या बटालीयनने नियमानुसार त्यांच्यावर अंतिम संस्कार केले.