वर्धा - महात्मा गांधी यांची हत्या करण्याचे सहा प्रयत्न झाले होते. मारेकऱ्यांच्या 72 वर्षांपूर्वी केलेल्या प्रयत्नांना दुर्दैवाने यश आले आणि बापू आपल्यातून गेले. त्यांची हत्या होऊन 72 वर्ष झाली तरी आजही वेगवेगळ्या माध्यमातून गांधींच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी भावना सर्व सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव भाई विद्रोही यांनी व्यक्त केली. महादेव भाई यांनी विद्यमान केंद्र सरकारवरही अनेक आरोप केले.
सेवाग्राम मध्ये दरवर्षी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त एक दिवसाचा उपवास ठेवला जातो. मात्र, यावर्षी देशभरात चर्चेत असलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात बैठा सत्याग्रह सर्व सेवा संघाच्यावतीने केला जाणार आहे.
हेही वाचा - मानखुर्दमध्ये पादचारी पूल कोसळला; 2 जण जखमी
महात्मा गांधींना मारून त्यांचे विचार मारले जाऊ शकत नाही. यापूर्वीही महात्मा गांधींना रावणाच्या रुपात दाखवत एक व्यंगचित्र छापण्यात आले होते. यामध्ये अखंड भारत असे लिहून सावरकर हे बाण घेऊन रामाच्या भूमिकेत दाखवले होते, अशी माहिती महादेव भाई यांनी दिली.
महात्मा गांधींच्या हत्येचे सहा प्रयत्न झाले होते, त्यातील एक प्रयत्न 1944 मध्ये सेवाग्रामच्या प्रवेशद्वारावर झाला होता. गांधीजी 1944 मध्ये मुस्लीम नेते जीना यांच्या भेटीला जाणार होते. त्यांनी भेटीला जाऊ नये यासाठी त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता.
काय होता तो हत्येचा कट -
महात्मा गांधी आणि मुस्लीम नेते जीना यांची 1944 मध्ये मुंबईला एक बैठक होणार होती. या बैठकीला जाण्यासाठी महात्मा गांधी हे सेवाग्रामवरून मुंबईला जाणार होते. सकाळपासून सेवाग्राम आश्रमाच्या बाहेर आंदोलक जमले. काहीही झाले तरी बापूंना जीनांच्या भेटीला जाऊ न देण्याच्या प्रयत्नात ते होते. वरवर हा विरोध भेटीला असला तरी, यात त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. तत्कालीन पोलीस उपायुक्तांनी याबाबतची कल्पना बापूंना दिली.
पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी एका ग.ल. थत्ते नामक व्यक्ती जवळून 7 इंच लांब चाकू जप्त करण्यात आला. त्यावेळी त्या ठिकाणी नथुराम गोडसेही उपस्थित असल्याचा उल्लेख बापूंचे सचिव म्हणून काम पाहणारे किशोरभाई यांनी त्यांच्या डायरीत केला आहे. यासोबतच जगन्नाथ फडणवीस लिखीत 'गांधी की शहादत', चुनीभाई वैद्य लिखित 'गांधी की हत्या क्या सच क्या झूठ' यामध्ये गांधींजींची हत्या करणारा नथुराम गोडसे असल्याचा उल्लेखसुद्धा आहे, अशी माहिती महादेव भाई विद्रोही यांनी दिली.