वर्धा - संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात एक वन स्टॉप सेंटर सुरू आहे. वर्ध्यात सामान्य रुग्णालयातील धर्मशाळेत हे कार्यालय सुरू आहे. मागील 4 महिन्यातच जवळपास 43 महिलांना लाभ मिळाला असल्याने या सेंटरचे कौतुक होत आहे.
अपेक्षित मदत एकाच छताखाली
वन स्टॉप सेंटर खऱ्या अर्थाने पीडित महिलांना एकाच छताखाली अपेक्षित मदत पुरवणारे सेंटर आहे. यात लैंगिक शोषणाच्या पीडित, मानवी वाहतुकीस बळी पडलेल्या, अॅसिड हल्यातील पीडित महिलेस वैद्यकिय सुविधा, पोलीस मदत केंद्र, समुदेशन केंद्र, कायदेशीर मदत, तातपुरता निवारा इत्यादी सेवा देण्याचा उपक्रम आहे. तीन महिन्यात एकूण 43 पीडित महिलांना वेगवेगळ्या समस्यांवर सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
सखी वन स्टॉप सेंटरच्या वतीने काही काळापासून अडचणीत असलेल्या महिलांना आधार देण्याचे काम करण्यात आले. यात एका प्रकरणात काही कारणामुळे घरातून निघून गेलेल्या महिलेचा शोध घेऊन झालेल्या दाम्पत्याला पुन्हा भेट घडवून आणून देण्यात आली.