वर्धा - जिल्ह्यात कोरोनाचा संक्रमण वाढत आहे. या परिस्थिती मृत्यूच्या संख्येतही वाढ झाली आहे. लक्षणे असणाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. यात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबीयांना प्रकृतीची माहिती मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्यातच एका रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रकृतीच्या चौकशीसाठी फोन केला असता, त्यांना रुग्णालयातून माहिती मिळालीच नाही. एवढेच नाही तर रुग्णालयातून थेट रुग्ण दगावल्यावरच नातेवाईंकाशी संपर्क साधला असल्याचा धक्कादायक प्रकार सेवाग्राम रुग्णालयात समोर आला आहे.
वर्धा जिल्ह्यातील सावंगीचे आचार्य विनोबा भावे आणि सेवाग्रामचे कस्तुरबा गांधी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांनावर उपचार केला जातो. सध्या कोरोनाची लागण झाली असल्याचे कळाले तरी रुग्ण आणि नातेवाईक घाबरून जात आहेत. असे असताना एखदा कोरोनाबाधित रुग्ण कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णालयात दाखल केल्यास त्यानंतर नातेवाईकांना त्या रुग्णाशी संपर्क साधने देखील शक्य होत नसल्याचा प्रकार समोर येत आहे. विशेषता व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या प्रकृती बाबत रुग्णालयाकडून माहिती मिळत नसल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, असाच असाच एक प्रकार सेवाग्राम रुग्णालयात समोर आला आहे. या रुग्णालायातून रुग्णाच्या प्रकृतीची माहिती मिळण्याऐवजी त्या रुग्णाच्या कुटुंबीयांना थेट निधन वार्ता मिळाली आहे.
प्रशासनाने घेतली दखल-
याबाबत उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे म्हणाले, की कुटुंबीयांना अशा काळात प्रकृतीची माहिती मिळालीच पाहिजे. यासाठी दोन्ही रुग्णालयांना सूचना देत मनुष्यबळ नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहे. अतिदक्षता किंवा जे रुग्ण स्वतःबद्दल माहिती देऊ शकत नाही. त्यांच्या कुटुंबीयांना किमान दिवसातून ठराविक २ वेळेला प्रकृतीची इत्यंभूत माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे येत्या काळात नक्कीच याचा फायदा रुग्णाच्या कुटुंबीयांना होणार आहे.
वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूदर पाहता रुग्णालय प्रशासनावर ताण वाढत आहे. तेच पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबियांनाचीही चिंता वाढत आहे. हीच परिस्थिती राज्यातील अनके जिल्ह्यात असल्याचे पुढे येत आहे. यामुळे घेण्यात आलेल्या निर्णयाने नक्कीच फरक पडेल अशी आशा करूया आणि गरज असल्यास याचे अनुकरणही करायाला काहीच हरकत नसणार.