वर्धा - एचटीबीटी कापूस बियाणे घरात आढळल्याने शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत इरपाते असे गुन्हा दाखल शेतकऱ्याचे नाव आहे. प्रशांतकडून राज्य सरकारने बंदी घातलेला एचटीबीटी कापूस बियाण्याचे 8 पॅकेट जप्त करण्यात आले. सिंदी रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत सेलडोह येथील घरातून हे बियाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले.
एचटीबीटी वाणावर सरकारने बंदी असल्याने त्याची विक्री लागवड करता येत नाही. यावर नुकतेच शेतकरी संघटनेने 'मी पेरले बियाणे मी गुन्हेगार' या शिर्षकाखाली आंदोलन करण्यात आले. यावर खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे प्रशांत इरपाते याच्या घरी छापा मारण्यात आला. यावेळी घराची झडती घेतली असता बंदी असलेले बियाणे आढळून आले. ते बियाणे पथकाने जप्त केले. यामध्ये आरसीओटी बिजी 3 चे 450 ग्रामचे 7 पॉकेट जप्त करण्यात आले. जादू बिजी 3 चे एक पॉकिट जप्त करण्यात आले.

यावेळी जप्त करण्यात आलेले प्रशांत इरपाते याला विचारपूस केली असता, हे कपाशीचे पॉकिट पेरणीसाठी आणल्याचे त्याने सांगितले. एका अनोळखी व्यक्तीने बियाणे स्वस्तात दिल्याने विकत घेतले. यात पॉकिट आणि कंपनीची माहितीकडे दुर्लक्ष केल्याचेही तो म्हणाला. पाऊस चांगला झाला असल्याने लवकरच पेरणी करणार असल्याचे सुद्धा त्याने सांगितले.
बिजी3 पाकिटांवरील माहिती गायब
या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या पॉकेटवर पॅकेजिंग तारीख, एक्सपायरी तारीख, किंमत, कंपनीचे नाव, लॉट नंबर, जर्मिनेशन टेस्ट, व्हेरायटी, टेबल नंबर यासारखी माहिती आढळून आली नाही. यावर किंमत सुद्धा नसल्याची माहिती पंचनाम्यात नोंद करण्यात आली. यात जप्त करण्यात आलेल्या पॉकेटची किंमत अंदाजे 5840 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी संजय बमनोटे आणि सेलू पंचायत समितीचे कृषी अधिकारी मनोज नागपूरकर यांनी ही कारवाई केली. त्यांनी कारवाई करत याबाबतची माहिती सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याला दिली आहे. यात प्रशांत इरपाते याच्यावर गुन्हा दखल करत प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.