वर्धा - रामदास तडस हे सलग दुसऱ्यांदा वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. २३ मे रोजी उशिरा निकाल लागल्यामुळे त्यांना विजयी मिरवणूक काढता आली नाही. मात्र, दिल्लीहून परत आल्यानंतर त्यांची सोमवारी शहरातील जुने राम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मिरवणूक काढली.
तडस यांनी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांचा १ लाख ८७ हजार मताधिक्याने पराभव करत विजय मिळवला. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येणार होता. पण रात्री उशिरा निकाल लागल्यामुळे कार्यकर्त्यांना मिरवणूक काढता आली नाही. त्यामुळे दिल्लीहून परत येताच तडस यांच्या विजयानिमित्त ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी अनेकांनी गळाभेट घेत पेढे भरवत आनंद व्यक्त केला. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी फुलांचा हार घालत त्यांना शुभेच्छा दिल्या. मिरवणुकीनंतर खासदार तडस यांनी कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानले. मिरवणुकीत खासदार तडस यांच्यासह आमदार पंकज भोयर, भाजपचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.