वर्धा - वर्ध्यात भूमिपुत्र संघर्ष वाहिनीच्या वतीने, मुंबईतील दादर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावरील हल्याचा निषेध करण्यात आला. हा निषेध वर्ध्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हातात बॅनर घेऊन नोंदवण्यात आला. यावेळी हल्ला करणाऱ्या समाजकंटकाना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनातील 17 वर्षे वास्तवास राहिलेले घर म्हणजे राजगृह. मुंबईच्या दादर परिसरात असलेल्या या ऐतिहासिक वास्तूच्या परिसरातील साहित्यांची दोन समाजकंटकानी हल्ला करत तोडफोड केली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे. वर्ध्यातही भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने या घटनेचा तीव्र निषेध करत आंदोलन केले.
राजगृह हे आम्हा सगळ्या भीम भक्तांसाठी श्रद्धेचे ठिकाण असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५० हजाराहून अधिक ग्रंथांचा संग्रह करत मोठ्या परिश्रमाने जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय उभे केले आहे. या ऐतिहासिक ग्रंथालयावर हल्ला करून हल्लेखोराने मानसिकता दाखवली आहे. या मानसिकतेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध नोंदवतो, अशी तीव्र प्रतिक्रिया भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत फाळके यांनी दिली.
या घटनेतील त्या दोन माथेफिरूना त्वरित अटक करून शिक्षा करावी, ही मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला करण्यात आली आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांना निवेदनही देण्यात आले. या आंदोलनात रितेश घोगरे, योगेश घोगरे, प्रवीण काटकर, प्रमोद राऊत, सचिन घोडे, विवेक लोहकरे, पंकज इंगोले, प्रवीण पेठे, समीर राऊत, स्वप्नील किटे,अभिजीत कुत्तरमारे, आदी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - जिवंत माणसाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा...वर्ध्यात 'प्रहार'चे लक्षवेधी आंदोलन
हेही वाचा - वऱ्हाड्याचा झटका; वर्ध्यात लग्नानंतर 7 दिवसानी चक्क नवरदेवच निघाला कोरोनाबाधित...